स्वारगेट बसस्थानकाचा विकास पीपीपी तत्त्वावर, तर शिवाजीनगरचे काम ‘मेट्रो’कडे - प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:12 IST2025-09-15T19:12:25+5:302025-09-15T19:12:38+5:30
पुढील दोन ते तीन वर्षांत या दोन्ही बसस्थानकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची उद्दिष्ट आहे

स्वारगेट बसस्थानकाचा विकास पीपीपी तत्त्वावर, तर शिवाजीनगरचे काम ‘मेट्रो’कडे - प्रताप सरनाईक
पुणे: शिवाजीनगर बसस्थानक विकसित करण्याचे काम मेट्रोने करावे, असा प्रस्ताव एसटी महामंडळाने पाठविला आहे. तर स्वारगेट बसस्थानकाचे काम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून पीपीपी तत्त्वावर करून घेण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत या दोन्ही बसस्थानकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची उद्दिष्ट असल्याचे मत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी (दि. १५) पुणे दौऱ्यावर असताना वाकडेवाडी आणि शिवाजीनगर बसस्थानकांची पाहणी केली. यावेळी एसटी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रताप सरनाईक म्हणाले, अनेक बसस्थानकांतील सुलभ शाैचालयाचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे; परंतु ज्यावेळी मंत्री पाहणी करण्यास येतात, तेव्हा ते स्वच्छ आणि टापटीप ठेवतात. इतर वेळी पुन्हा घाणीचे साम्राज्य असते. परंतु स्थिती बदलली पाहिजे. तसेच शिवाजीनगर बसस्थानकात पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांची सोयी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. म्हणून आरेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच दुग्धविकास मंत्र्यांशी बाेलून याठिकाणी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवाशांना येणाऱ्या अडचणी दूर येतील. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांकडून चुकीचे काम होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. एसटी प्रवाशांना, ग्राहकांना जेवढ्या चांगल्या सुविधा देण्यात येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय राज्यातील अनेक बसस्थानकांचे कामे करून ते विकसित करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात याबाबत बैठक होणार आहे.
बससंख्या वाढविणार
पुणे विभागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लवकरच नवीन बस देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी सोय होणार आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकातील सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षांवरून ९८ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हणाले.