-अंबादास गवंडी पुणे :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील १४ आगारांतर्गत येणाऱ्या ४२ स्थानकांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाले असून, सर्व स्थानकावर सुरक्षारक्षक, सुरक्षा भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था या गोष्टींची कमतरता आढळून आली आहे.स्वारगेट आगारात घडलेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही धक्कादायक बाब समाेर आली आहे. यातून धडा घेत भविष्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाेस उपाययाेजना करण्याची आवश्यकता असून, त्याबाबतचा अहवाल एस. टी.च्या मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात आला आहे.आठवड्यापूर्वीच स्वारगेट बसस्थानकात पहाटेच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते. पुणे विभागात ही घटना घडल्यामुळे त्यांनी तातडीने पुणे विभागातील १४ आगारांतर्गत येणाऱ्या ४२ बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे.ऑडिटमध्ये चार गोष्टींना दिले प्राधान्यपुणे विभागातील ४२ बसस्थानकांवर सुरक्षा ऑडिट करताना प्रत्येक बसस्थानकात प्रामुख्याने प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, सुरक्षा भिंत आहे का? या चार गोष्टी तपासण्यात आल्या. परंतु, बहुतांश स्थानकावर या गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षा ऑडिटमध्ये या सर्व गोष्टी तेथे असाव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
पुणे विभागातील ४२ बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाले. यामध्ये सुरक्षेविषयी ज्या गोष्टींची कमतरता आहे, त्याविषयी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक