Swargate Case: आरोपी अत्यंत शातीर; बचाव करण्यासाठी दत्तात्रय गाडे म्हणतो, 'मी तृतीयपंथी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:38 IST2025-03-04T11:37:06+5:302025-03-04T11:38:23+5:30
आरोपीला अटक केल्यानंतर अनेक प्रकारच्या वावड्या उठल्याची धक्कादायक माहिती समोर

Swargate Case: आरोपी अत्यंत शातीर; बचाव करण्यासाठी दत्तात्रय गाडे म्हणतो, 'मी तृतीयपंथी'
पुणे: स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी दत्तात्रय गाडे या नराधमाने २६ वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचे सांगून बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. शुक्रवारी पहाटे आरोपीला पुण्यात आणून अटक करण्यात आली. याप्रकरणी पुणेपोलिसांकडे आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळाले असल्याची माहिती शनिवारी मिळाली. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी ससून रुग्णालयात केली. तो अहवाल देखील पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्काराच्या घटनेनंतर अत्यंत बारकाईने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या आहेत. स्वारगेट पोलिस ठाण्याचे एपीआय रवींद्र कसपटे, नीलेश मोकाशी यांच्यासह शंकर संपत्ते, सागर केकान, नाना भानदुरगे, सुजय पवार, कुंदन शिंदे, विक्रम सावंत आणि राहुल तांबे या कर्मचाऱ्यांनी गुनाट गावातून आरोपीला ताब्यात घेत शहरात आणले. यावेळी पोलिसांनी एकमेकांना रात्री संदेश देण्यासाठी आणि आरोपी पकडला गेल्याचे सांगण्यासाठी लेजरचा वापर केला. त्यानंतर आरोपीला शुक्रवारी सकाळी अटक करून, न्यायालयात हजर केले असता १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी (दि.१) पोलिसांनी आरोपीचे स्टेटमेंट नोंदवत, त्याचे रक्त, केस डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपी अत्यंत शातीर
आरोपीला अटक केल्यानंतर अनेक प्रकारच्या वावड्या उठल्या आहेत. आरोपी हा समलैंगिक असून, त्याद्वारे तो पैसे मिळवायचा. यापूर्वी आरोपी दत्तात्रय याने पोलिसांना तृतीयपंथी असल्याचे देखील सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला त्याचा बचाव कशापद्धतीने करायचा, याबाबत चांगलीच माहिती असल्याचे सांगत तो शातीर असल्याचे सांगितले.