Nitin Gadkari: सरकारला दूर ठेवून लोकांच्या सहभागातूनच शाश्वत विकास साधता येतो - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:01 IST2025-09-15T15:01:00+5:302025-09-15T15:01:50+5:30
चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते, त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते

Nitin Gadkari: सरकारला दूर ठेवून लोकांच्या सहभागातूनच शाश्वत विकास साधता येतो - नितीन गडकरी
पुणे: सामाजिक कार्य हे केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न ठेवता लोकशक्तीच्या जोरावर करणे गरजेचे आहे. सरकारला दूर ठेवून लोकांच्या सहभागातूनच शाश्वत विकास साधता येतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नाम फाउंडेशनचा रविवारी (दि. १४) दशकपूर्ती समारंभ स्वारगेट येथील गणेश कला मंच येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्त भागातील पुनरुत्थान, पर्यावरण संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या विविध उपक्रमांतून फाउंडेशनने गेल्या दहा वर्षांत ग्रामीण भागात केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार भीमराव तापकीर, ‘नाम’चे संस्थापक-अध्यक्ष अभिनेता नाना पाटेकर, संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते. त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते. ‘नाम’ने केलेले कार्य महत्त्वाचे असून ‘देणारे हात होण्यापेक्षा मदत करणारे हात होता आलं पाहिजे. जेवढ्या जास्त प्रमाणात आपण कौशल्य निर्माण करू तेवढे आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहू. त्यासाठी समाजासाठी संवेदनशील काम करणे गरजेचे आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला वर्गासाठी ५ तासांचे काम वर्क मॉड्युल राबवणे गरजेचे आहे. यातून अधिकाधिक महिलांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सप्टेंबर २०१५ साली ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाली आणि त्याची दशकपूर्ती होत आहे. या वाटचालीत आजवर असंख्य हातांनी माणुसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले. मानवतेचा हा यज्ञ यापुढेही असाच अखंडपणे चालत राहील, यासाठी ‘नाम फाउंडेशन’ कटिबद्ध असल्याचे ‘नाम’चे संस्थापक-अध्यक्ष नाना पाटेकर आणि संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.