पुणे : प्रतिस्पर्धी नीलेश घायवळ टोळीच्या अमोल बधेचा खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणेचे कोठडीदरम्यान बाहेरच्यांशी फोनवर बोलणे करून देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी निलंबित केले आहे. तपासादरम्यान हस्तक्षेप आणि तपासावर परिणाम होईल, असे कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. पोलीस नाईक सुधीर घोटकुले आणि शिवाजी जाधव अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गजा मारणे टोळीने कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीच्या पप्पू गावडे आणि नंतर अमोल बधेचा खून केल्यानंतर गजा मारणे, रूपेश मारणे फरारी होते. या फरारी काळात त्यांच्या हे पोलीस कर्मचारी संपर्कात होते, अशी वरिष्ठांना माहिती मिळाली होती. परंतु, त्या वेळी गजाला अटक करणे अगर हजर करणे आवश्यक असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे काणाडोळा केला होता. पोलीस कोठडीमध्ये असताना त्याचे बाहेरील लोकांशी घोटकुले आणि जाधव यांनी मोबाईलद्वारे बोलणे करून दिले. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यामुळे या दोघांवरही तातडीने कारवाई करण्यात आली. हस्तक्षेप कोणत्या प्रकारचा होता, हा तपासाचा भाग असल्याचे सांगण्यात आले.
गजा मारणेला मदत करणारे पोलीस निलंबित
By admin | Updated: December 19, 2014 23:51 IST