येवले यांचे तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन, ‘तशी’ सवय असलेल्या येवलेंवर राजकीय वरदहस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:13 IST2025-11-13T09:13:02+5:302025-11-13T09:13:18+5:30
Suryakant Yewale News: बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणाऱ्या निलंबित तहसीलदारांना अशा कामांची सवयच असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले होते.

येवले यांचे तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन, ‘तशी’ सवय असलेल्या येवलेंवर राजकीय वरदहस्त
पुणे - बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणाऱ्या निलंबित तहसीलदारांना अशा कामांची सवयच असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले होते. त्याचाच प्रत्यय सध्या येत आहे. सूर्यकांत येवले नायब तहसीलदार म्हणून दाखल झाल्यानंतर तहसीलदार पदावर पोहोचेपर्यंत त्यांचे तब्बल चार वेळा निलंबन झाले आहे. गडचिरोली, माण खटाव (सातारा), इंदापूर (पुणे) व सध्या पुणे याठिकाणी त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदारपद बहाल केले जाते आणि अशा प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन बदनाम होते. यावरून अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे, तर यामागे मोठा राजकीय हातही असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एफआयआरमध्ये उल्लेख
बोपोडी येथील सुमारे १३ एकर जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात आहे. ही जमीन १९५५ मध्ये रीतसर कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याचे सातबारा उताऱ्यावरून स्पष्ट होत आहे. मात्र, सूर्यकांत येवले यांनी ही जमीन विद्वांस यांच्या अर्जानंतर कुळाच्या नावे केली.
याच प्रकरणावरून जिल्हा प्रशासनाने येवले यांच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या एफआयआरमध्ये येवले यांना अशा स्वरूपाचे कृत्य करण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कशासाठी निलंबन झाले होते, याची माहिती दिली आहे.