Suresh Kalmadi Passes Away : राजकारणातील सबसे बडा खिलाडी हरपला..!
By राजू हिंगे | Updated: January 6, 2026 21:55 IST2026-01-06T21:51:17+5:302026-01-06T21:55:02+5:30
पुणे महापालिकेवर एकेकाळी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. पालिकेच्या माध्यमातून सुरेश कलमाडी यांनी तीन दशके ‘पुण्याचे कारभारी’ म्हणून काम केले.

Suresh Kalmadi Passes Away : राजकारणातील सबसे बडा खिलाडी हरपला..!
पुणे : पायलटच्या सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदापासून सुरुवात करून ते राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार झाले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथान, पुणे फेस्टिव्हलसह राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर काटशहाचे राजकारणही त्यांनी केले.
पुणे काँग्रेसवर वर्चस्व आणि पक्षश्रेष्ठींशी अत्यंत घनिष्ठ संबंध त्यामुळे विकासकामांसाठी कलमाडी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्याने ‘पुणे म्हणजे सुरेश कलमाडी’ असे समीकरण तयार झाले होते. कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या चढत्या आलेखाला २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपाने ‘ब्रेक’ लागला. कलमाडी यांना अटक झाली पण न्यायालयीन लढाईत त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करू शकले नाहीत.
भारतीय वायुसेनेत पायलट असलेले सुरेश कलमाडी १९७४ मध्ये स्क्वॉड्रन लीडर म्हणून निवृत्त झाले. कलमाडी पुण्यात आले. कलमाडी यांची ओळख तत्कालीन काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी झाली. शरद पवार यांच्या प्रोत्साहनाने ते युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. पुणे युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष बनले. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना जनता पार्टीचे सरकार सत्तेत होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू होती. त्याच मोरारजी देसाई पुण्यात आले होते तेव्हा कलमाडींच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने झाली. टिळक रोडवरून देसाईंचा ताफा जात असताना कलमाडींनी त्यांच्यावर चप्पल फेकली होती. शहर काँग्रेसमधील नेत्यांना बाजूला सारत सुरेश कलमाडी हे काँग्रेसचा चेहरा बनले. १९८२ आणि १९८८ मध्ये ते प्रथम राज्यसभेचे खासदार बनले होते. १९९१ नंतर शहरातील काँग्रेसवर त्यांच्या वरदहस्त राहिला. १९९४ साली ते राज्यसभेचे खासदार झाले होते. लोकसभेच्या १९९८ निवडणुकीत सुरेश कलमाडी काँग्रेसमधून बाहेर पडले. अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विठ्ठलराव तुपेंकडून कलमाडींचा पराभव घडवून आणला.
रेल्वेचे अंदाजपत्रक मांडणारे एकमेव रेल्वे राज्यमंत्री
कलमाडी यांची १९९८ ची राज्यसभा निवडणूक खूप गाजली होती. काँग्रेसचे मातब्बर उमेदवार माजी केंद्रीय सचिव राम प्रधान यांचा पराभव करून कलमाडी अपक्ष म्हणून निवडून आले होते पण त्याच्या पुढच्या वर्षी शरद पवारच काँग्रेसमधून बाहेर पडले. कलमाडी पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर कलमाडी यांनी पुण्याच्या राजकारणामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. यासोबतच सन १९९६, २००४, २००९ मध्ये असे ३ वेळा ते पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस खासदार म्हणून विजयी झाले. सन १९९५ ते १९९६ पर्यंत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बनले. संसदेत रेल्वेचे अंदाजपत्रक मांडणारे ते एकमेव रेल्वे राज्यमंत्री होते.
पुण्याचे कारभारी
पुणे महापालिकेवर एकेकाळी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. पालिकेच्या माध्यमातून सुरेश कलमाडी यांनी तीन दशके ‘पुण्याचे कारभारी’ म्हणून काम केले. कलमाडी याचा राजकारणात दबदबा होता. अनेकांना त्यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक केले. कलमाडी महापालिकेत यायचे तेव्हा तर एक वेगळा माहौल असायचा. महापौर, उपमहापौर ते नगरसेवक त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरच हजर असत. 'सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी' अशा घोषणा दिल्या जायच्या. शहरातील राजकारणावर कमांड आणि पक्षश्रेष्ठींशी अत्यंत घनिष्ठ संबंधांमुळे विकासकामांसाठी कलमाडींनी कोट्यवधी रुपयांचा निधी शहरात आणला. दिल्ली समजलेले ते नेते होते. पुणे वेगवेगळ्या बाबतीत आंतरराष्ट्रीय नकाशावर कसे जाईल, यादृष्टीने त्यांनी दूरदृष्टीने वेगवेगळे उपक्रम सुरू केले. त्यात पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल, पुणे फेस्टिव्हल असे अनेक उपक्रम आजही सुरू आहेत.
कलमाडींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘पुणे पॅटर्न’
पुणे महापालिकेच्या २००७ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्याचा कारभारी बदला, असे आवाहन केले होते. पुणेकरांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याचवेळी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधील सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली होती. त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे तेव्हाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांना विश्वासात घेतले होते. पुणे महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपला बरोबर घेऊन ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले पुण्याचा महापौर झाल्या होत्या. शिवसेनेला उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यावेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हा ‘पुणे पॅटर्न’ मोठा गाजला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ‘पुणे पॅटर्न’ तोडण्यात आला. त्यानंतर पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली. आघाडीने पाच वर्ष काम केले. २०१७च्या निवडणुकीत पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली होती.
आरोपाने लागली राजकारणाला उतरती कळा
दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती. याप्रकरणी कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यानंतर कलमाडी यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल २०२५ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करू शकले नाहीत. कलमाडी यांचे मंगळवारी निधन झाले. पुण्याच्या राजकारणातील ‘सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी’ या पर्वचा अस्त झाला.