Sure run in a marathon ... but, take heart! | मॅरेथॉनमध्ये जरूर पळा...पण, हृदय सांभाळा!
मॅरेथॉनमध्ये जरूर पळा...पण, हृदय सांभाळा!

ठळक मुद्देवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; तपासणी केल्यानंतरच धावाक्षमतेपेक्षा अधिक ताण घेऊ नका मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंपैकी सात जणांना हृदयविकाराचा झटका

- प्रज्ञा केळकर- सिंग 
पुणे : मॅरेथॉनमध्ये मी ३ किलोमीटर, १० किलोमीटर किंवा २१ किलोमीटरचा टप्पा गाठणार... अनेकांनी मनाशी या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा निश्चय केलेला असतोच! आपली शारीरिक क्षमता, आहार, व्यायाम यांचे गणित जुळवून प्रत्येकाने हा टप्पा ठरवलेला असतो. शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने मॅरेथॉन हा मैलाचा दगड ठरतोच. मात्र, त्यासाठी आपले शरीर तयार आहे का, याचा विचार प्रत्येकाने प्राधान्याने करायलाच हवा. क्षमतेपेक्षा जास्त ताण घेऊन कोणताही धोका पत्करणे इष्ट ठरत नाही.
मुंबई मॅरेथॉनमध्ये रविवारी (दि. १९) उत्साहाने सहभागी झालेल्या धावपटूंपैकी सात जणांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अतिउत्साहात किंवा केवळ मित्र-मैत्रिणी सहभागी होत आहेत, म्हणून अनेक जण मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. मात्र, सहभागी होण्यापूर्वी आपला सराव, त्यातील नियमितता, हृदयाशी संबंधित तपासण्या या सर्व निकषांवर स्वत:ला तपासून पाहणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
‘लोकमत’शी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश इनामदार म्हणाले, ‘मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी ‘क्लिनिकल एक्झामिनेशन’ अत्यंत आवश्यक असते. यामध्ये रक्तदाब, आॅक्सिजनचे प्रमाण, हृदयाच्या ठोक्यांची नियमितता (कार्डिओग्राम), हृदयाची सोनोग्राफी अर्थात २ डी इको अथवा कलर डॉपलर या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करुन ज़्दयाची क्षमता जाणून घेता येते. हृदयाची अनियमितता आहे की नाही, हे तपासण्यांमधून जाणून घेता येते. सूक्ष्म तपासण्यांमधून अचूक निदान होते. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी इन्ड्यूरन्स टेस्ट करून घेणेही आवश्यक असते. बरेचदा फिजिशियन किंवा टेक्निशियनकडून वरवर तपासण्या करून घेतल्या जातात. यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यावर हृदयावर अतिरिक्त ताण आल्याने धोका संभवतो.’
मॅरेथॉनमध्ये धावण्याचा गेल्या १३ वर्षांचा अनुभव असलेले ७२ वर्षीय धावपटू जुगल राठी यांनी याबाबत ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शास्त्रशुद्ध सराव पूर्ण झाल्याशिवाय मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ नये. आपल्या हृदयाची क्षमता तज्ज्ञांच्या मदतीने जाणून घ्यावी. 
३-१०-२१-४२ असे टप्पे खूप सरावाअंती गाठता येतात. तयारी न करता मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साह घातक ठरू शकतो. अंतर, वेग, वेळ जाणून घेण्यासाठी सराव करताना रनकीपर वॉचचा वापर करता येईल.  
............
प्रत्येकाच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असते. धावण्याचा वेळ अचानक वाढला की हृदयावर ताण येतो. आपले शरीर एवढा ताण सहन करण्यास सक्षम आहे की नाही, यावर बºयाच बाबी अवलंबून असतात. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ महिने ते ६ महिने आधीपासून सरावाला सुरुवात करावी. २० मिनिटांपासून धावायला सुरुवात करावी. हळूहळू अंतर वाढवावे. वाढवलेले अंतर किमान एक आठवडा कायम ठेवावे. आहार हाही महत्त्वाचा घटक असतो. कार्बोहायड्रेटचे सेवन करणे, जंक फूड टाळणे या बाबी फिटनेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. धावताना केवळ पाणी पिणे पुरेसे नसते. घामातून सोडियमचे प्रमाण घटते. त्यामुळे पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल मिसळून ते प्यावे.- दीप्ती आंबेकर, फिटनेस ट्रेनर.
.............
मॅरेथॉनमध्ये धावताना हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला आडवे ठेवावे, हृदयाची नाडी तपासावी, मेडिकल टीमच्या साह्याने ऑक्सिजन लावावा आणि तातडीने रुग्णालयात दाखल करावे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी प्री पार्टिसिपेशन स्क्रीनिंग सक्तीचे केले पाहिजे. एन्ड्युरन्स टेस्ट केल्याशिवाय स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देऊ नये.- डॉ. अविनाश इनामदार, हृदयरोगतज्ज्ञ

Web Title: Sure run in a marathon ... but, take heart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.