गुंडांना राजाश्रय, पुण्यातील थरारक घटनेनंतर सुप्रिया सुळेंचा संताप; गृहमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:26 IST2024-03-07T15:24:28+5:302024-03-07T15:26:35+5:30
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांवर टोळक्याने तलवार-कोयत्यांनी हल्ला करुन दहशत माजविली.

गुंडांना राजाश्रय, पुण्यातील थरारक घटनेनंतर सुप्रिया सुळेंचा संताप; गृहमंत्र्यांकडे मागणी
मुंबई/पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी थेट गोळीबाराच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे आमदारानेच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याची घटनाही समोर आली होती. तर, फेसबुक लाईव्हमध्ये मुंबईतील माजी नगरसेवाचा खून करण्यात आला. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला जाब विचारत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, पुन्हा एकदा पुण्यात तलवारीने वार करण्याचा थरार घडल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच, गुंडांना राजश्रय मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांवर टोळक्याने तलवार-कोयत्यांनी हल्ला करुन दहशत माजविली. या घटनेत दुचाकीस्वार पळून गेल्याने त्यांचे प्राण वाचले. या अशा घटना अतिशय गंभीर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे, याचा हा नमुना आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असून यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र दहशतीखाली जगावे लागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच, गृहखात्याने या घटनेची तातडीने दखल घेऊन अशा पद्धतीने दहशत माजविणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्याची गरज आहे, अशी मागणीही सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण
बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पुण्यातील गोऱ्हे बुद्रुक येथे १० ते १२ जणांच्या जटोळीने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात नचिकेत संजय जगताप, ऋषिकेश दिलीप जगताप, निलेश हिरामण शहा हे तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना पुणे- पानशेत रस्त्यावर गोऱ्हे बुद्रुक गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर घडली. जगताप दुचाकीवरून जात होते. तर एक जण पायी जात होता. त्यावेळेस हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेने परिसरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास हवेली पोलीस करत आहे.