पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. ९ एप्रिल) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही. तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी पंधरा दिवसांमध्ये कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं मत मांडलं होतं. त्यानंतर एक महिन्यांमध्ये कामाला सुरुवात करू अशा प्रकारचे पत्र जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी पाठवलं. परंतु आता सुवर्णमध्य काढत 22 दिवसानंतर म्हणजेच 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं आहे.
सुप्रिया सुळे आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. प्रशासनाचे अधिकारी सुप्रिया सुळेंना उपोषणस्थळी भेटायला आले होते. यावेळी काम कधी सुरु होणार असल्याचे सुप्रिया यांनी विचारले. या कामाला अंदाजे ५० लाख लागत आहेत. डीपीसी कडून ते बजेट मंजूर आहे. आम्ही पावसाळ्यापूर्वी काम सुरु करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्री येतात तेव्हा रस्ता रात्रीतून तयार होतो. तुम्ही तारीख सांगा. ती सांगणार नसाल तर तुम्ही चहा घेवून जा असं अधिकाऱ्यांना सुप्रिया म्हणाल्या. तसेच १४ दिवसात काम सुरु करणार असाल तर उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी सांगितले. दिनांक 9 मे पर्यंत रस्ता कामाला सुरुवात करू असं अधिकारी म्हणत होते. पण अखेर सुवर्णमध्य काढत 22 दिवसानंतर म्हणजेच 2 मे ला कामाला सुरुवात असल्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडले आहे.