पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्यास उत्सुक आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. त्यावर काही कार्यकर्ते या एकत्रीकरणाला विरोध करीत आहेत. मात्र, दुसरीकडे काही नेते या एकत्रीकरणाबाबत अतिशय उतावळे झाले आहेत. त्यातच पुण्यातील डेक्कन चौकामध्ये सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, या आशयाचे पोस्टर लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी बैठक येत्या बुधवारी होणार आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावर मुंबईत चर्चा होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वी डेक्कन चौकामध्ये लागलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे, या पोस्टरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. तसेच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र असल्याचादेखील फोटो या पोस्टरमध्ये वापरण्यात आला आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांच्याकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर ‘सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा. साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोडले आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात. आपण सगळेजण एकत्र येण्याची संपूर्ण महाराष्ट्र खूप आतुरतेने वाट पाहत आहे,’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.