आईची गळफास घेत आत्महत्या; सहा महिन्यांची मुलगी सापडली मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:46 IST2021-03-11T18:46:09+5:302021-03-11T18:46:49+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट...

आईची गळफास घेत आत्महत्या; सहा महिन्यांची मुलगी सापडली मृतावस्थेत
वडगाव मावळ : एका महिलेने घरातील सिलींग फॅनला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर अवघ्या सहा महिन्याची तिची मुलगी देखील घरात मृत अवस्थेत आढळली. ही घटना वडगाव मावळ येथे शिवरात्रीच्या दिवशी घडली आहे.
रागिणी महेश दुधाने (वय २९) श्रीशा महेश दुधाने (वय ६ महिने, रा.जयमल्हार, रेसिडन्सी खंडोबा मंदिराजवळ) अशी मृत मायलेकींचे नावे आहेत.याबाबत मयुर दतात्रय दुधाने याने पोलिसांकडे माहिती दिली.
वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश दुधाने हे बाहेर जाऊन कोचींग क्लास घेतात. त्यांनी या ठिकाणी स्वत:चा फ्लॅट घेतला आहे. गुरूवारी त्यांचा भाऊ मयुर घरी गेला असता दरवाजा आतून बंद होता. त्याने आपल्या वहिनीला दार उघडण्यासाठी आवाज दिला. दरवाजा ठोठावला. परंतू , दरवाजा न उघडल्याने त्याने त्याचा भाऊ महेशला फोन करून सांगितले की, वहिनी दरवाजा उघडत नाही. तू लगेच ये. नंतर महेश आला त्याने गॅलरीत प्रवेश करून काच फोडून घरात प्रवेश केला. मुख्य दरवाजाची कडी उघडली. बेडरूमचा दरवाजा तोडला. आत पाहिल्यानंतर रागिणी हिने गळफास घेतला होता. तर श्रीशा ही बेशुध्द अवस्थेत पडली होती.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक एस. जे. खोत यांनी भेट दिली. दोघींनाही शासकीय रूग्णालयात नेले. डाॅक्टरांनी तपासले असता मृत झाल्याचे घोषित केले. रागिणीच्या गळफास का घेतल्याचे कारण समजू शकले नाही तर लहान मुलीचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हा अहवाल आल्यानंतर समजणार आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस.जे. खोत करत आहे.