मजुरी करून मुलाला बनविले उपजिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 02:13 IST2019-02-18T02:12:58+5:302019-02-18T02:13:45+5:30
दोन्ही मुलांना दिले उच्च शिक्षण

मजुरी करून मुलाला बनविले उपजिल्हाधिकारी
कोंढवा : आकाश अवतारे हा एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून सतरावा तर अ.जा. प्रवगार्तून दुसरा येऊन उपजिल्हाधिकारी झाला आहे. आकाश आयटी इंजिनियर असूनही प्रशासकीय सेवेत जाण्याच्या हेतूने मागील पाच वर्षांपासून अभ्यास करीत होता. वडील अमृत अवतारे आणि आई आशा अवतारे दोघांनी मजूरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलांना उच्चशिक्षित केले.
आकाशचे १ ली ते ७ वी पर्यंतचे पूर्ण शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले आहे. ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय,लासोना उस्मानाबाद येथे झाले आहे. जरी आकाशने ११ वी च्या वर्षी कला शाखेत ४ महिने घालवले तरी नंतर त्याने सायन्समध्ये प्रवेश घेऊन बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण सायन्समधून पूर्ण केले. पुढील पदवीचे शिक्षण आयटी इंजिनीअर शासकीय महाविद्यालय कराड येथून पूर्ण केले. प्रशासकीय सेवेत जाण्याच्या जिद्दीने पाच वर्ष पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी स्वयंअध्ययन केले. कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वयंअध्यन, सातत्यपूर्ण कष्ट, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने यश अक्षरश: खेचून आणले. सुरुवातीला यूपीएससी परीक्षेची दोनदा मुख्य परीक्षा दिली आणि आता एमपीएससी परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद मिळवले आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि सतत आई-वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवत स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवणे हीच प्रेरणा उराशी बाळगत ध्येयासाठी झटत होतो. मोठा भाऊ हा माझा मार्गदर्शक आणि आई-वडील हेच प्रेरणास्रोत आहेत. माझा मोठा भाऊ सूरज अवतारे हा नेहमी खंबीर पाठीशी राहीला. त्याच्या पाठींब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आणि आई वडिलांच्या आशीवार्दामुळेच मी यशाचं शिखर सर करू शकलो. स्वत:वर विश्वास ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते इतकं खात्रीशीर सांगू शकतो.
- आकाश अवतारे