तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण; पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:11 IST2025-07-17T20:10:36+5:302025-07-17T20:11:07+5:30
गुन्हा दाखल होताच आरोपी पैलवान पसार झाले असून, दोन दिवसांनंतरही आरोपींचा शोध घेण्यात सहकारनगर पोलिसांना अपयश

तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण; पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून शोध सुरूच
पुणे : पोलिस भरतीची तयारी करणार्या तरुण-तरुणींना धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याप्रकरणी पैलवानांसह ७ जणांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्यप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेसातच्या सुमारास तळजाई पठारावरील मैदानावर घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पैलवान पसार झाले असून, दोन दिवसांनंतरही आरोपींचा शोध घेण्यात सहकारनगर पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता पुणे फिटनेस अकॅडमिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, निलेश केदारी, हर्षवर्धन सावंत, तौशिफ, पात्रुट यांच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. विकास नाना मेटकरी (३२ , धंदा नोकरी, रा. अरुणोदय सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मेटकरी मंगळवारी (दि. १५) सकाळी साडे सातच्या सुमारास पुणे फिटनेस अकॅडमीच्या मुला-मुलींसह तळजाई ग्राउंडवर धावण्याचा सराव करत होते. त्यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपी पैलवान ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, निलेश केदारी, हर्षवर्धन सावंत, तौशिफ, पात्रुट व इतरांनी मेटकरी व त्यांचा मित्र रविंद्र चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यानी मारहाण केली. मेटकरी यांच्या डाव्या डोळयाला व चेहऱ्याला दुखापत झाली. तेव्हा त्यांच्यापैकी आरोपीने बाजूला पडलेला दगड दोन्ही हातामध्ये उचलला. त्यानंतर याला आज जिवे ठारच मारतो असे म्हणून मेटकरी यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.
अकॅडमीमधील मुली मारहाण होत असलेल्यांना सोडवण्यास गेल्या असता त्यांना आरोपींपैकी एकाने अश्लील शिवीगाळ केली. घटनेप्रकरणी १५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला असून, आरोपी पैलवान मोबाइल बंद करून पसार झाले आहेत. त्यांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, दोन दिवसांनंतरही आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली.
पैलवानाकडून मारहाणीची तक्रार, पुणे फिटनेस अकॅडमी विरोधात गुन्हा...
तळजाई मैदानावर झालेल्या हाणामारी प्रकरणी आता पैलवान अमर साबळे (२२ रा. वडगाव बुद्रूक) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विकास मटकरी, मुजीम पठाण यांच्यासह अकॅडमीतील विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. छातीवर बसून पाच-सहा वेळा मारल्याची तक्रार साबळेने दिली आहे. मुलांच्या मारहाणीत हाताला जखम झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यश बोराटे करत आहेत.