विमाननगर येथील लेडीज हाॅस्टेलमध्ये विद्यार्थीनीची आत्महत्या ; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 21:09 IST2020-04-02T21:08:05+5:302020-04-02T21:09:21+5:30
विमाननगर येथील सिंबायाेसिस महाविद्यालयाच्या लेडीज हाॅस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे.

विमाननगर येथील लेडीज हाॅस्टेलमध्ये विद्यार्थीनीची आत्महत्या ; कारण अस्पष्ट
विमाननगर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार विमाननगर येथील एका लेडीज होस्टेलमध्ये बुधवारी रात्री घडला. समिधा कालिदास राऊत (वय 20 रा. गडचिरोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.
पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथील सिंबायोसिस कॉलेज लेडीज होस्टेल येथे एका विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. घटनास्थळी विमानतळ पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता लेडीज होस्टेल मधील विद्यार्थिनी समिधा राऊत हिने तिच्या खोलीमधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. समिधा ही मूळची गडचिरोलीची होती. मास मीडिया अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात ती शिकत होती. तिच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत ती मैत्रिणींसोबत होती. झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला. तिने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले करीत आहेत.