वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:32 PM2019-07-31T14:32:39+5:302019-07-31T14:37:35+5:30

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे...

strong rainfall in veer, Bhatghar, Nira-Deoghar Dam area | वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेने धरणसाखळीत ७ टक्के पाणीसाठा कमी बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना प्रतीक्षा

बारामती : राज्यात सर्वत्र धुवाधार सुरू असताना बारामती शहर तालुका तुलनेने कोरडाच आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतकऱ्यांना नीरा डावा कालव्याच्या पाण्याने आधार दिला; मात्र धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३० जुलैपर्यंत भाटघर ६९.५६ टक्के, नीरा-देवघर ७७.३७ टक्के, वीर ९८.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ३० जुलै रोजी हाच पाणीसाठा धरणनिहाय भाटघर ८४.६४ टक्के, नीरा-देवघर ८४.९३ टक्के,वीर ९८.१९ टक्के असा पाणीसाठा होता. यंदा एकूण धरणसाखळीमध्ये ७८.०४ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ८५.१४ टक्के होता.
बारामतीच्या बागायती परिसराला मूळ पाणीस्रोत उपलब्ध नाही. नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमुळेच तालुक्याचा काही भाग बागायती झाला. तर, पाण्यापासून वंचित राहिलेला भाग जिरायती बनला. या भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानला जातो. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर,परिसरात अल्प पाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती,पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा-देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडेच बारामतीकरांच्या नजरा असतात.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार : ३० जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.भाटघर धरण १६,३४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे, तर सध्या या धरणात ९६७ दशलक्ष घनफूटने पावसाचे  पाणी येत आहे. नीरा-देवघर धरणात ९०७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या धरणात ११९६ दशलक्ष घनफूटने पाणी येत आहे.वीर धरणात ९२३८ दशलक्षघनफू ट पाणीसाठा असून ११६५ दशलक्षघनफूटने धरणात पावसाचे पाणी येत आहे.
दर वर्षी वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात येते. यंदा मात्र अनेक वर्षांनंतर प्रथमच नीरा-देवघरचे नीरा डावा कालव्याला मिळणारे पाणी थांबविण्यात येणार आहे.भाजप खासदारांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागाने नीरा-देवघर प्रकल्पातून मिळणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दर वर्षी शेतीला मिळणाऱ्या पाच आवर्तनात दीड ते दोन आवर्तनाची घट होणार आहे. नेमके किती पाणी शेतीच्या आवर्तनामध्ये घटणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन  १६ जुलैपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीचा बागायती भाग पाऊस लांबून देखील कालव्याच्या पाण्यावर तरला आहे. 
पाटबंधारे उपविभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत  बारामती शहर परिसरात ३११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील इतर पाऊस पुढीलप्रमाणे : वडगाव निंबाळकर ४०५,मानप्पावस्ती ३०८ मिमी, पणदरे २४४, माळेगाव कॉलनी ३०९,सणसर १७५ मिमी,अंथुर्णे ११९ मिमी, निमगाव केतकी १५३ मिमी, बावडा ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, नाझरे परिसरात ४२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

......
...
शेटफळ हवेली तलावात ११.४७ दशलक्षघनफूट पाणीसाठा
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलावात अवघा ११.४७ दशलक्षघनफूट पाणीसाठा आहे.हा पाणीसाठा शून्य टक्के असल्यात जमा आहे. या तलावावर परिसरातील १२ गावांची शेती अवलंबून आहे.या तलावात वीर-भाटघर धरणातूनच पाणी सोडण्यात येते.त्यामुळे धरणांमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतरच, शेटफळ-हवेली तलावामध्ये पाणी नीरा डावा कालव्याद्वारे सोडण्यात येते. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यानंतरच, १२ गावांमधील शेतीला पाणी मिळणे शक्य होणार आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे  शेती सिंचन आवर्तन सुरू आहे. शेती आवर्तन संपल्यानंतरच शेटफळ-हवेली तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे,अशी माहिती येथील प्रभारी अभियंता अजित जमदाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना 
.......
पावसाने मारले, नीरा डावा कालव्याने तारले
बारामती तालुक्यात दोन मोठ्या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र आहे. माळेगाव आणि भवानीनगर येथील श्री छत्रपती या दोन्ही कारखान्यांचे बारामती तालुक्यात हजारो एकर ऊसक्षेत्र आहे. ऊसपीक पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे.ठिबक सिंचनाचा पर्याय वापरून कमी पाण्यावर ऊसपीक घेण्याचा मार्ग देखील दोन्ही कारखान्यांनी अवलंबला आहे; मात्र अल्प पर्जन्यमान झाल्यानंतर देखील नीरा डावा कालव्याच्या पाण्यावर हजारो एकर ऊसक्षेत्र जगविले जाते.त्यामुळे पावसाने  मारले तरी, नीरा डावा कालवा शेतकºयांना तारतो,असा कायमचा अनुभव आहे.याचे श्रेय ब्रिटिशांना दिले जाते.ब्रिटिशकालीन धरणे,कालव्यांमुळे ही किमया साधणे शक्य झाले आहे.
......
...
 पूल ४० हजार क्युसेक्स विसर्गास पाण्याखाली जाणार 
वीरधरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर धरणातील विसर्ग वाढणार आहे. मंगळवारी (दि. ३०) सकाळी असणारा २३,५०० क्युसेक्सवर असणारा विसर्ग दुपारी ३४,५०० क्युसेक्स करण्यात आला. वीर धरणासमोरील पूल ४० हजार क्युसेक्स विसर्गास पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आवश्यक दक्षता घ्यावी,असे आवाहन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. 
 

Web Title: strong rainfall in veer, Bhatghar, Nira-Deoghar Dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.