रोहिडा किल्ल्यावर खडा पहारा, धांगडधिंगाना करणाऱ्यांना देणार चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:59 IST2025-12-30T17:59:25+5:302025-12-30T17:59:38+5:30
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढत दिलेल्या असंख्य शूरवीरांच्या बलिदानाने आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे

रोहिडा किल्ल्यावर खडा पहारा, धांगडधिंगाना करणाऱ्यांना देणार चोप
भोर : भोर तालुक्यातील रोहिडेश्वर, रायरेश्वर आणि मोहनगड या किल्ल्यांवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान भोर, राजगड विभागाच्या वतीने किल्ल्यावर कडक पहारा मोहीम राबविण्यात येणार आहे.
नववर्षात या गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि पवित्रता राखण्यासाठी बुधवारी (दि. ३१) मांसाहार, मद्यपान व तोडफोडीवर आळा घालण्यासाठी रोहिडेश्वर, रायरेश्वर आणि मोहनगड या किल्ल्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढत दिलेल्या असंख्य शूरवीरांच्या बलिदानाने आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे. म्हणूनच लाखों शिवभक्त, दुर्गप्रेमी, व दुर्गसेवकांकरिता ही ठिकाणे श्रद्धास्थान आहेत.
या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दुर्गसेवक तत्पर आहेत. यासाठी रोहिडेश्वरावर सुनील खळदकर, ऋषी बांदल, चेतन शिवतरे, राज शिवतरे; मोहनगडावर आनंद चव्हाण, वेदान्त कुडपणे, सार्थक धावले, ओंकार घाडगे; तसेच रायरेश्वरावर ज्ञानेश्वर खोपडे, ओंकार बांदल, माउली आवाळे, संस्कार अनभुले हे दुर्गसेवक कडक पहारा देतील.