बारामतीतील तीन गावांमध्ये हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 13:46 IST2021-05-16T13:37:27+5:302021-05-16T13:46:28+5:30
पाच जणांवर गुन्हा दाखल

बारामतीतील तीन गावांमध्ये हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई
बारामती: बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन गावांमध्ये अवैध हातभट्टी व देशी दारु विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कार्यवाही केली आहे. यामध्ये मुद्देमाल जप्त करुन पोपट एकनाथ ननावरे (रा. मोढवे), संदीप शंकर गव्हाणे (रा . माळेगाव), प्रमीला संजय राठोड, मोनिका विजय गायकवाड आणि लाला दिलीप सकट पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ननावरे आणि गव्हाणे बारामती तालुक्यात मोढवे येथे हातभट्टी दारु तयार करून जवळच्या व्यक्तीला विक्री करत होते. त्यांच्याकडे पंधरा लिटर हातभट्टी दारु आढळून आली. प्रमिला राठोड मोरगाव येथे मयुरेश्वर विद्यालय शाळेच्या पाठीमागे आंबी रस्त्यालगत हातभट्टी विक्री व्यवसाय करत होती. येथे पोलीसांनी धाड टाकून पाच लिटर हातभट्टी दारु मुद्देमाल जप्त केला आहे. मोरगाव मध्ये मोनिका विजय गायकवाड संत्रा या देशी दारुची विक्री करत असल्याने त्यांवर कारवाई केली आहे. सुपा येथे लाला दिलीप सकट यास हातभट्टी दारु विक्री प्रकरणी पोलीसांनी धडक कार्यवाही केली. येथे ६१ प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये हाभट्टी दारु विक्री करण्यासाठी ठेवली असल्याचे आढळून आले. वडगांव निंबाळकरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळुंके आणि त्यांच्या पथकाने कार्यवाही केली.