चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आंबेगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:10 IST2024-12-20T13:10:11+5:302024-12-20T13:10:55+5:30
प्रशासनाने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने आणि गांभीर्याने या समस्येकडे पाहणे आवश्यक

चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आंबेगावातील घटना
धनकवडी : आंबेगाव पठार परिसरातील चंद्रांगण फेज ५ मधील सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून, ताे गंभीर जखमी झाला आहे. समर्थ सचिन सूर्यवंशी असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
समर्थवर पाच-सहा श्वानांनी हल्ला केला असून, त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर खाेल जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. मागच्याच आठवड्यात आंबेगाव बुद्रुकमधील दळवीनगर परिसरातील आराध्या अभय चव्हाण या चिमुकलीवर भटक्या श्वानाने हल्ला चढवला हाेता. त्यात ती जखमी झाली हाेती. याच घटनेच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका मुलाला चावा घेतला. त्यामुळे धनकवडीसह आंबेगाव बु. परिसरात माेठ्या प्रमाणात वाढलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येकडे प्रशासनाच्या हाेत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे संबंधित विभागाकडून होणारा कानाडोळा पुणेकरांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने आणि गांभीर्याने या समस्येकडे पाहणे आवश्यक आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व नियंत्रण पथकांमार्फत होणारी कारवाई परिणामकारक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
श्वानांची दहशत दिवसेंदिवस जीवघेणी ठरत असताना प्रशासन मूग गिळून गप्प का? भटक्या श्वानांचा बंदोबस्त कधी करणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून, श्वानांची झुंड दिसली तरी मनात धडकी भरते. - अनिल कोंढरे, उपसरपंच, आंबेगाव बु.