PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:17 IST2025-01-09T11:16:23+5:302025-01-09T11:17:34+5:30
अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर

PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं?
पुणे : शहरात लाखो प्रवाशांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) आणि महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेले स्टेनलेस स्टीलचे बसथांबे आज दुरवस्थेत आहेत. जिथे प्रवाशांची गरज आहे, तिथे बसथांब्यांची कमतरता आहे आणि जिथे गरज नाही, तिथे उभे केलेले थांबे आज धूळखात पडले आहेत. अशी अवस्था असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरभरात चार हजारांपेक्षा जास्त बसथांबे असून प्रत्येक थांब्यासाठी सरासरी ७ ते १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, या थांब्यांचा योग्य वापर होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर. शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्टॉपची उभारणी करण्यात आली असली, तरी त्यांचे व्यवस्थापन व उपयोगाबाबत अनेक ठिकाणी उदासीनता दिसून आली आहे.
एकीकडे प्रवशांसाठी व्यवस्था नसताना दुसरीकडे अनेक ठिकाणी उभारलेले बसस्टॉप धूळखात पडले आहेत. ना प्रवासी तिथे थांबतात, ना बस थांबते. परिणामी, जिथे खरोखर गरज आहे, तिथे सुविधांअभावी प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागते. शहरातील मुख्य रस्ते, शाळा-कॉलेज परिसर, औद्योगिक क्षेत्रे आणि बाजारपेठेच्या ठिकाणी बसस्टॉपची तातडीने उभारणी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने प्रवाशांच्या गरजा ओळखून योग्य ठिकाणी बसस्टॉपची उभारणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे.
बसथांबा आहे कुठे?
मित्रमंडळ कॉलनी येथे पर्वती दर्शन येथे बसथांबा नाही. प्रवाशांना बसायला बाक नाही. उभे राहण्यासाठी छप्पर नाही, इलेक्ट्रिक सिटी बॉक्सवर कागदाच्या तुकावर बसथांबा, बस नंबर लिहून लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी बसथांबा आहे की नाही, हेच नागरिकांना कळत नाही, तर सहकारनगर भागात पीएमपी बसथांबाच नाही, प्रवासी थांबणार कुठे? झाडाच्या पाठीमागे अस्पष्ट पिवळी पाटी आहे. बसची वाट पाहत प्रवाशांना रस्त्यावर तासनतास उभे राहावे लागत आहे. यावर ना प्रशासन, ना पीएमपी काही सुधारणेकडे दुर्लक्ष करत आहे. ‘पीएमपी’च्या अनेक थांब्यांवर फक्त स्टेनलेस स्टीलचे सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. परिणामी, फाटक्या-तुटक्या बसथांब्यांवर बसची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर ओढवली आहे.
रोजची अवस्था
रस्त्यावरील बसेस : १,५७० (कमी-अधिक),
प्रतिदिन सरासरी प्रवासी संख्या : १० लाख.
एकूण बसस्थानके : ४ हजारांपेक्षा अधिक
वास्तव काय?
‘पीएमपी’ने प्रत्येक बसथांब्यासाठी सरासरी सात ते दहा लाख रुपये खर्च केला. नगरसेवक, आमदार, खासदारांच्या निधीतून हे बसथांबे उभारले गेले. काही बसथांबे महापालिकेने ‘पीएमपी’ला दिलेल्या पायाभूत सुविधांच्या निधीतून उभारले गेले. थांब्यांवर बसचे वेळापत्रक नसले तरी आमदार, खासदार आणि नगरसेवकांची नावे मात्र दिमाखात झळकत आहेत. काही ठिकाणी थांबा नसून केवळ पाट्या राहिल्या आहेत. सांगाडे दुरुस्त करण्याची तसदी मात्र ना पीएमपी घेत आहे, ना महापालिका. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापच सहन करावा लागत आहे.
प्रवाशांना मोठ्या अडचणी
महत्त्वाच्या ठिकाणी बसस्टॉपची कमतरता दिसून येत आहे. शहरातील मुख्य रस्ते, शाळा-कॉलेज परिसर, औद्योगिक क्षेत्रे आणि बाजारपेठेच्या ठिकाणी बसथांब्यांची अत्यंत गरज आहे. मात्र, या ठिकाणी बसस्टॉप उभारण्यात आले नाहीत किंवा असले तरी ते मोडकळीस आले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बस थांबत नसलेल्या ठिकाणी बसस्टॉप उभारून उपयोग काय? जिथे गरज आहे, तिथेच ही सुविधा हवी. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रवाशांच्या गरजा लक्षात न घेता बसस्टॉप उभारल्यामुळे आम्हाला रोज गैरसोयींचा सामना करावा लागतो. - दीप्ती साळुंखे, प्रवासी
निष्क्रिय बसस्टॉपवर खर्च करणे थांबवा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य ठिकाणी सुविधा द्या. प्रवाशांची संख्या आणि गरज लक्षात घेऊनच बसस्टॉप ठरवायला हवेत. तसेच, बसस्टॉपची दुरुस्ती आणि देखभाल नियमित केली जावी. - प्रशांत कांबळे, प्रवासी