Pune: बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी ससून रूग्णालयातून चोरले शिक्के, एकाला अटक

By नितीश गोवंडे | Published: December 22, 2023 12:30 PM2023-12-22T12:30:34+5:302023-12-22T12:31:18+5:30

प्रकाश पांडुरंग मोंडकर (३४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.....

Stamps stolen from Sassoon hospital to make fake fitness certificate, one arrested | Pune: बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी ससून रूग्णालयातून चोरले शिक्के, एकाला अटक

Pune: बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी ससून रूग्णालयातून चोरले शिक्के, एकाला अटक

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयाची चर्चा संबंध देशभर होत आहे. त्यातच ससून रूग्णालयातून बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी शिक्के चोरणाऱ्या एकाला रुग्णालय प्रशासनाने पकडून बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले आहे. त्याने डॉक्टर आणि कर्मचारी यांची नजर चुकवून डॉक्टरांचे शिक्के चोरले, या शिक्क्यांच्या आधारे त्याने बनावट मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रकाश पांडुरंग मोंडकर (३४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार सत्पाल पवार (रा. ओगलेवाडी, कराड, सातारा) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (२६, रा. गुंजन सोसायटी, रास्तापेठ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ दामशेट्टी हे ससून रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून वार्ड नंबर ७४ या ठिकाणी आरएमओ म्हणून नोकरीस आहेत. वैद्यकीय अधीक्षक किरणकुमार जाधव हे त्यांचे प्रमुख म्हणून काम करतात. १४ डिसेंबर रोजी ससून रूग्णालयातील वॉर्ड नंबर ७४ या ठिकाणी काम करत असताना डॉ. जाधव हे रुग्णांच्या केस पेपरवर सही करत होते. त्यावर शिपाई अरूण मांडवेकर हे सरांच्या सही खाली त्यांचा शिक्का मारण्याचे काम करत होते. त्याच दिवशी दुपारी डॉ. जाधव यांनी पेशंटच्या केस पेरवर सही केली परंतु, मांडवेेकर यांनी शिक्का शोधला असता त्यांना तो सापडला नाही. याबाबत त्यांनी लगेचच डॉ. जाधव यांना सांगितले. त्यावेळी मांडवेकर यांनी शेवटी आलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटी आलेल्या व्यक्तीने ते शिक्के खिशात घालून नेल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्हीत कैद झालेली व्यक्ती बुधवारी डॉ. जाधव यांची सही घेण्यासाठी आल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव मोंडकर असल्याचे सांगितले. तसेच त्याची बॅग तपासली असता त्याच्या बॅगेत त्यांना दोन शिक्के सापडले.

दरम्यान त्याला ताब्यात घेऊन त्याला बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एका पेपरवर प्रकाश मोंडकर नावाचे फिटनेस तपासल्याची नोट आणि त्यावर डॉ. प्राजक्ता बहिलूम यांच्या नावाचा शिक्का मारून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे निदर्शनास आल्याने मोंडकर सह त्याच्या साथीदारावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Stamps stolen from Sassoon hospital to make fake fitness certificate, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.