पुणे: राज्य सरकारकडून महिलांनामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत गेल्यावर्षी वाढ झाली होती; परंतु जानेवारी २०२५ मध्ये तिकीट दरात वाढ केल्याने एसटी प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत लाखाने कमी झाली असून, उत्पन्न मात्र वाढले आहे. पुणे विभागात जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत ७९ लाख ३ हजार महिलांनी प्रवास केला असून, ३८ कोटी ३० लाख २८ हजार ६९५ इतके उत्पन्न मिळाले आहे.
एसटीची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. याअंतर्गत महिलांना एसटीतून प्रवास करण्यासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या महिला सन्मान योजनेला महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जानेवारी महिन्यात तिकीट दरात वाढ करण्यात आले. त्यानंतर प्रवासी संख्येत घट होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पुणे विभागात जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यात पुणे विभागात ८५ लाख ५७ हजार ९०३ महिलांनी प्रवास केला होता. त्यातून ३७ कोटी ६५ लाख दोन हजार इतके उत्पन्न मिळाले होते. तर २०२५ मध्ये या चार महिन्यांत ७९ लाख ३ हजार महिलांनी प्रवास केला असून, ३८ कोटी ३० लाख २८ हजार ६९५ इतके उत्पन्न मिळाले आहे. या महिन्यात जवळपास सात लाखांपेक्षा जास्त महिला प्रवासी संख्या घटले असून, उत्पन्न मात्र कोटीने वाढले आहे.