बसचालक-वाहक दिसणार चॉकलेटी रंगाच्या गणवेषात; ७० वर्षांत प्रथमच बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:33 IST2018-01-04T18:27:57+5:302018-01-04T18:33:31+5:30
वर्षानुवर्षे खाकी कपड्यात दिसणारे बसचे वाहक आणि चालकांच्या कपड्याचा रंग गडद होणार आहे. हा कलर चॉकलेटी रंगाकडे झुकणारा आहे.

बसचालक-वाहक दिसणार चॉकलेटी रंगाच्या गणवेषात; ७० वर्षांत प्रथमच बदल
पुणे : नवीन वर्षांत एसटीतील कर्मचाऱ्यांच्या पेहरावात बदल करण्यात येणार आहे. शिपायापासून ते बसचा चालक आणि वाहकाचा गणवेश देखील बदलला आहे. वर्षानुवर्षे खाकी कपड्यात दिसणारे बसचे वाहक आणि चालकांच्या कपड्याचा रंग गडद होणार आहे. हा कलर चॉकलेटी रंगाकडे झुकणारा आहे. त्यामुळे त्यात फारसा बदल जाणवणार नाही. महिला वाहकासाठी साडीचा देखील पर्याय उपलब्ध असेल. गेल्या सत्तर वर्षांत प्रथमच गणवेशात बदल होत आहे.
येत्या ६ जानेवारीला (शनिवारी) मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन ‘गणवेश वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यक्रम होईल. पुण्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते गणवेशाचे वितरण होईल.
एसटी महामंडळात विविध १६ विभागात १ लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात होते. मात्र, ते कापड पसंत न पडल्याने आपल्या सोईने कर्मचारी गणवेशाचे कापड खरेदी करीत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी एका रांगेत उभे राहिले, तर नेमका गणवेशाचा खाकी रंग कोणता? हे ओळखणे कठीण होत असे. त्यामुळे एकाच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये अगदी रंगापासून शिलाई पर्यंत वैविध्य दिसून येई. त्यामुळे गणवेश (युनिफॉर्म) हा शब्दच त्यांच्या बाबतीत चुकीचा ठरत होता.
केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीतील ‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान’ या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश ‘डिझाईन’ तयार करण्याकरीता नेमण्यात आले होते. या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील एसटीच्या कर्मचाऱ्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधून, त्यांचे कामाचे स्वरूप, त्याच्या गरजा, स्थानिक हवामान यांचा विचार करून नवीन गणवेशाचे प्रारूप तयार केले. त्याचे सादरीकरण सर्व कामगार व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींपुढे करण्यात आले. त्यावर यांच्या सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार त्यात आवश्यक ते बदल करुन गणवेश तयार करण्यात आले आहेत. शिपाई, वर्क शॉपमध्ये काम करणारे, बस चालक आणि वाहक अशा विविध विभागात काम करणाऱ्यांचे गणवेश बदलण्यात आले आहेत.