SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:43 IST2025-05-13T11:43:33+5:302025-05-13T11:43:49+5:30
Maharashtra 10th SSC Result 2025 Declared: दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.

SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकण पुन्हा 'नंबर वन' आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
आज मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. या वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे.
या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण : ९९.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
ऑनलाईन निकाल येथे पाहता येणार
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org