श्री तीर्थक्षेत्र नारायण बेट : दिशादर्शक फलकावरून वाद पेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:12 IST2019-02-08T00:12:20+5:302019-02-08T00:12:38+5:30
दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू नारायणमहाराज बेट या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तर, काही प्रवासी या ठिकाणी नव्यानेच येत असतात.

श्री तीर्थक्षेत्र नारायण बेट : दिशादर्शक फलकावरून वाद पेटला
खोर : दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू नारायणमहाराज बेट या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तर, काही प्रवासी या ठिकाणी नव्यानेच येत असतात. त्यामुळे या ठिकाणी जाण्याच्या रस्त्याचा व किलोमीटरचा फलक लावण्याचे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विसरला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांबरोबर येथील नागरिकांनी केली आहे.
तीर्थक्षेत्र असलेले दौंड तालुक्यातील श्री सद्गुरू नारायणमहाराज बेट हे पंचक्रोशीतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील श्री नारायणमहाराज व दत्तभक्तांचे श्रद्धास्थान तसेच पवित्र आणि रम्य तीर्थक्षेत्र आहे. दर गुरुवारी व श्रीक्षेत्र बेट येथील उत्सवाला महाराष्ट्रातून भक्तगण या ठिकाणी येतात. यासाठी बेट येथे जाण्याकरिता योग्य दिशादर्शक व अंतर दाखविणारा फलक असणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही.
संस्थेचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे, भक्त आणि श्री नारायण सेवा मंडळातर्फे दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे, की लवकरात लवकर या फलकावर तीर्थक्षेत्र श्री नारायण बेट व अंतराचा उल्लेख करावा, तसेच नंबर भक्तांना दिसेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा.
दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाने सराईतपणे श्रीक्षेत्र नारायण बेटाचे नाव वगळल्याचे दिसते. तसेच, छायाचित्रात जो प्रवेशद्वारामागे नंबर दिसतो, तोही भाविक-भक्तांच्या नजरेस न पडेल अशा ठिकाणी लावण्यात आला आहे. त्यावरील अंतरेदेखील अंदाजाने टाकलेली दिसत आहेत.