किरण शिंदे
पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणेमृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर आता वैष्णवीच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. परंतु वैष्णवीचे १० महिन्यांचे बाळ आता पोरके झाले आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हे बाळ हगवणे कुटुंबाचा निकटवर्तीय निलेश चव्हाणकडे होते. त्यावेळी वैष्णवी हगवणेचे वडील आणि कुटुंबीय नऊ महिन्याच्या तिच्या मुलाला घेण्यासाठी गेले. त्यावेळी निलेश चव्हाण याने बंदूक दाखवून धमकी दिली. त्यामुळे ते मुलाला न घेताच परत आले होते. अखेर या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा वळण घेतले असून निलेश चव्हाणच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१९ साली चव्हाण याच्यावर स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. निलेशने पत्नीच्या बेडरूममध्ये लपवून स्पाय कॅमेरे बसवले होते. तसेच त्याच्याशी लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे निलेश चव्हाणवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. शिवाय त्याच्याकडे पोकलेन मशीनही आहे. कर्वेनगर येथील औदुंबर पार्क सोसायटीत त्याच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत. पोलिस तपासात या संपत्तीचा वापर गैरप्रकार करण्यासाठी केला का याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
वैष्णवी हगवणेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांविरोधात गंभीर आरोप केले होते. पोलिसांकडून तपास सुरू असतानाच राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार झाले होते. अखेर सात दिवसांच्या शोधानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी कस्पटे कुटुंबीय निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, त्याने पिस्तुल दाखवून त्यांना धमकावले. या घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश चव्हाण वर नेमके आरोप काय आहेत?
- निलेशने पत्नीच्या बेडरूममध्ये लपवून स्पाय कॅमेरे बसवले होते.
- त्याच्याच लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले होते.
- पत्नीच्या विरोधानंतरही त्याने गळा दाबून धमकावले आणि बलात्कार केला..
- या घटनेची माहिती निलेशच्या कुटुंबाला दिल्यानंतर त्यांच्याकडूनही छळ झाल्याचा आरोप आहे.
- २०२२ मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला..