शेताची कामे करताना दिवसाही दर्शन; मंचरमध्ये २ मादी बिबटे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:42 IST2025-12-12T19:41:32+5:302025-12-12T19:42:44+5:30
शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना दिवसादेखील बिबट दिसत असल्याने शेतीचे काम करणे कठीण झाले आहे.

शेताची कामे करताना दिवसाही दर्शन; मंचरमध्ये २ मादी बिबटे जेरबंद
मंचर: मंचर वनपरिक्षेत्र हद्दीत जवळे आणि गांजवेवाडी (वळती) या दोन ठिकाणी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन मादी बिबटे जेरबंद झाले आहेत.अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे बिबट्याचा उपद्रव वाढला होता. नागरिकांच्या मागणीनुसार लायगुडेमळा येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बुधवारी पिंजरा लावला होता.आज पहाटेच्या सुमारास अंदाजे एक ते दीड वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली आहे. या परिसरात शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना दिवसादेखील बिबट दिसतात. त्यामुळे शेतीचे काम करणे आता कठीण झाले आहे. तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील वळती येथे नागरिकांच्या मागणीनुसार गुरुवारी गोविंद गांजवे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसविण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास अंदाजे एक ते दीड वर्षाची बिबट्याची मादी या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. दोन्ही ठिकाणी वनविभागाचे वनरक्षक बी.एच. पोत्रे, बिबट कृती दलाचे धर्मेंद्र ढगे, चारुदत्त बांबळे,देवेद्य वाघ, हर्षल गावडे, प्रज्वल आवारी, प्रकाश हिले यांनी भेट देऊन दोन्ही बिबट्यांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी बिबटे अवसरी वनउद्यान येथे नेले आहेत.