चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:37 IST2025-07-22T09:36:51+5:302025-07-22T09:37:10+5:30
भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली

चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू
पुणे: भरधाव रिक्षा दुभाजकावर आदळून रिक्षा चालक मृत्युमुखी पडल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर चांदणी चाैकात सोमवारी (दि. २१) मध्यरात्री घडली. गणेश कोळसकर (३५, रा.धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
रिक्षा चालक कोळसकर हा बाह्यवळण मार्गावरून मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगात निघाला होता. चांदणी चौकाजवळ भरधाव रिक्षा दुभाजकावर आदळली. अपघातात रिक्षाचा चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षात अडकलेल्या रिक्षा चालक कोळसकर याला बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेतील कोळसकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी दिली. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले.