पुणे : राज्य सरकारने अखेर पोलिस दलातील मोठ्या प्रमाणावर भरतीस मान्यता दिली असून, १८ हजार ६३१ पोलिस शिपायांच्या भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. जिल्हास्तरावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधींची प्रतीक्षा लागली होती.
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी दिलासा...
भरतीत सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे २०२२ व २०२३ मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही एक वेळची विशेष बाब मानली जात असून, त्यामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे.
जिल्हास्तरीय प्रक्रिया...
भरती प्रक्रिया जिल्हास्तरावरून राबवण्यात येणार असल्याने स्थानिक उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार उपलब्ध जागांचा तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
तरुणाईत उत्साह...
या भरतीची मागणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून होत होती. बेरोजगार तरुणांच्या विविध संघटनांनी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले होते. अखेर सरकारने निर्णय घेतल्याने तरुणाईत उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आमच्यासारख्या वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, याबद्दल आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने दिली.
पुढील टप्पा...
भरतीसंबंधी सविस्तर वेळापत्रक, शारीरिक व लेखी परीक्षेचे स्वरूप, अर्ज सादर करण्याच्या तारखा याबाबतचा तपशील लवकरच पोलिस भरती बोर्डाकडून जाहीर केला जाणार आहे.