पुणे: मार्चच्या महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याने चांगलाच उकाडा वाढल्याचे दिसून आले होते. दुपारी तर घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले होते. आता मात्र गेल्या दोन, तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गरमी कमी झाली नसली तरी उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात तापमान वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुढील दोन, तीन दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाचे डॉ. एस. डी सानप यांनी दिली आहे. सानप म्हणाले, मागील ३ दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. येणाऱ्या २, ३ दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पुणे ,नाशिक ,अहिल्यानगर जळगाव ,सातारा या ठिकाणी गारपीठ होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट असणार आहे. एप्रिल, मे, जून मध्ये देशात सरासरी पेक्षा जास्त तापमान असणार आहे. येणाऱ्या ५ दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
Maharashtra Weather Update: उन्हाने त्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा; राज्यात पुढील २, ३ दिवसात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:01 IST