काहींचे घरात बसून फेसबुक लाइव्ह; माझे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाइव्ह - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:02 IST2025-11-06T18:02:42+5:302025-11-06T18:02:59+5:30
एक साधा शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, हे माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शक्य झालं आहे

काहींचे घरात बसून फेसबुक लाइव्ह; माझे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाइव्ह - एकनाथ शिंदे
चाकण : आज मला काही लोक ‘भकास मंत्री’ म्हणतात. पण मुख्यमंत्री असताना मी स्वतः रस्त्यावर उतरून काम केलं. एक साधा शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. हे माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शक्य झालं आहे. काहींनी घरात बसून फेसबुक लाइव्ह केलं मी शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून थेट लाइव्ह करतोय, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाकण (ता.खेड ) येथील (दि.६) मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,खासदार श्रीरंग बारणे,माजी मंत्री विजयबापू शिवतारे,आमदार शरद सोनावणे,जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,इरफान सय्यद,नितीन गोरे,ज्योती अरगडे,मनीषा गोरे,विजय शिंदे,प्रकाश वाडेकर,विकास ठाकूर,रोहिदास गडदे,सचिन काळे,सुलभा उबाळे,महादेव लिंभोरे,नितीन पठारे,महेश शेवकरी,सचिन काळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांचे अनुदान, ‘लाडकी बहीण योजना’, ‘एस.टी.मध्ये सवलत’, आणि कर्जमाफी अशा अनेक लोक कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि ८० पैकी ६० जागांवर आम्हाला विजय मिळवून दिला. महिलांच्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले, लाडकी बहीण योजना ही आमच्या सरकारची संवेदनशील योजना आहे. काही अफवा पसरवल्या जात आहेत, पण मी स्पष्ट सांगतो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे.
चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, या भागात औद्योगिक वाढ झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. या समस्येवर उपाय म्हणून ५००० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच तळेगाव - चाकण - शिक्रापूर महामार्गाच्या कामाला प्रत्येक्ष सुरुवात होईल.
उपमुख्यमंत्री आले आणि खड्डे बुजले
चाकणच्या आंबेठाण चौकतील फूट दोन फुटांचे पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र याकडे स्थानिक नेतृत्वासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने रात्रीत खड्ड्यांमध्ये मुरूम भराव करून त्यावर रोलर ही फिरवण्यात आहे. तात्पुरता का होईना खड्ड्यातून नागरिकांची सुटका झाली आहे.