Pune Metro:...तर पीएमटी प्रवास करायला काय जातंय; प्रचंड गर्दी अन् पुणेकरांची विनोदनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 19:21 IST2022-03-06T19:21:16+5:302022-03-06T19:21:28+5:30
मेट्रो सुरु झाल्यावर गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत गर्दीत विनोदनिर्मिती करत पुणेकरांनी प्रवासाला सुरुवात केली.

Pune Metro:...तर पीएमटी प्रवास करायला काय जातंय; प्रचंड गर्दी अन् पुणेकरांची विनोदनिर्मिती
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सकाळी पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन करण्यात आले. मोदींनी गरवारे ते आनंदनगर मेट्रोने प्रवासही केला. उदघाटनानंतर मेट्रो सुरु होणार असल्याचे महामेट्रो प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार दुपारी ३ च्या सुमारास मेट्रो सुरु करण्यात आली होती. पुणेकरांनी अतिशय उत्साहात मेट्रोने प्रवास केल्याचे लोकमतच्या पाहणीतून दिसून आले. मेट्रो सुरु झाल्यावर गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत गर्दीत विनोदनिर्मिती करत पुणेकरांनी प्रवासाला सुरुवात केली.
२०१४ साली पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. तर २०१६ साली मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव मिळाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य नागरिक मेट्रोने प्रवास करण्यासाठी आले होते. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन सुरु असल्याचेही पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी तरी प्रत्येक फ्लॅटफॉर्मवर स्वच्छता पाहायला मिळाली. हीच स्वच्छता कायस्वरूपी राहावी अशी चर्चाही पुणेकरांमध्ये सुरु होती.
....तर पीएमटी प्रवास करायला काय जातंय; पुणेकरांची विनोदनिर्मिती
पहिल्याच दिवशी मेट्रोने प्रवास करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यावेळी ही गर्दी पाहून अनेक नागरिकांना बसची आठवण आली. एवढी गर्दी होणार असेल तर पीएमटीने प्रवास करायला काय जातंय. असे नागरिक यावेळी म्हणत होते. तर काहींनी हि मुंबई नाही, लोकल नाही गर्दीत अशी विनोदनिर्मिती करत जल्लोष केला.
तिकीट काउंटरवर गोंधळाचे वातावरण
पुणे मेट्रो नवीन असल्याने त्याठिकाणी असणारा स्टाफही नवीनच होता. त्यामुळे नागरिकांना तिकीट देत असताना रिटर्न तिकीट आणि सिंगल तिकीट यामध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. पण सगळंच नवीन असल्याने पुणेकरांकडून सहकार्य केले जात होते.
लहान मुलांना प्रवासाची आवड
मेट्रोने प्रवास करताना लहान मुलांचे आकर्षण मोठया प्रमाणावर दिसून आले. यावेळी एवढ्या गर्दीतूनही चिमुकले मेट्रोतून बाहेरचा परिसर बघत होते. आई वडील घाबरले असतानाही मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
मेट्रो स्थानकावर पोहोचल्यापासून ते दुसऱ्या स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित करण्यात आली आहे. तिकीट काउंटरवर ऑनलाइन पैसे दिल्यानंतर तिकीट मिळते. त्यानंतर स्वयंचलित यंत्राद्वारे तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्लॅटफाॅर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते. तीन डब्यांच्या मेट्रोला प्रत्येकी चार स्वयंचलित दरवाजे आहेत. आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वातावरण वातानुकूलित होते. त्याचबरोबर चार्जिंग व्यवस्थाही केली होती. प्रत्येक डब्यात एलइडी स्क्रीन असून आपण कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करू शकतो याची माहिती दिली आहे. स्वयंचलित दरवाजाच्यावरच एक स्क्रीन आहे त्यावर मेट्रोचा मार्ग, तसेच पुढे कोणते स्थानक आहे याची माहिती दर्शवली जात आहे.