...म्हणून दाभोलकर खटल्याच्या दोषारोपपत्रात ‘ते’ नाव समाविष्ट केले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:43 AM2023-08-22T11:43:40+5:302023-08-22T11:44:44+5:30

सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी सिंग यांची न्यायालयात माहिती

...so the name 'that' was not included in the charge sheet | ...म्हणून दाभोलकर खटल्याच्या दोषारोपपत्रात ‘ते’ नाव समाविष्ट केले नाही!

...म्हणून दाभोलकर खटल्याच्या दोषारोपपत्रात ‘ते’ नाव समाविष्ट केले नाही!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील सहआरोपी अमोल काळे याने पुरविलेले शस्त्र आणि दुचाकी याचा शोध घेतला का? त्याचे कुणाशी कनेक्शन होते याची चौकशी केली का? त्याची मानसशास्त्रीय मूल्यमापन चाचणी केली का? ब्रेन मॅपिंगसाठी अर्ज केला होता का? अशा प्रश्नांची सरबत्ती सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस.आर. सिंग यांच्यावर करण्यात आली.

बचाव पक्षाच्या वतीने सोमवारी उलट तपासणीदरम्यान हा प्रश्नांचा भडीमार केला गेला. त्यावर ‘नाही’ असे सांगून सिंग यांनी काळेविरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने त्याचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट केले नसल्याची माहिती न्यायालयाला दिली.

तब्बल चार महिन्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या खटल्याच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती केली आहे. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस.आर. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने सोमवारी उलटतपासणी घेण्यात आली.

संशयित आराेपीला अटक

  • सीबीआयने अमोल काळे, अमित डिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. 
  • त्याचाच धागा पकडत बचाव पक्षाचे ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी अमोल काळे याच्याविषयी सिंग यांना विचारले की, काळे याने शस्त्र आणि दुचाकी पुरविली होती याची माहिती मिळाली होती का? त्यावर ‘हो’ असे उत्तर सिंग यांनी दिले. 
  • मग त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला का? त्यावर सिंग यांनी नकारार्थी उत्तर दिले. 
  • त्याचे कुणाशी कनेक्शन होते, याबाबत चौकशी केली का? याचे आर्थिक स्रोत काय होते हे तपासण्याचा प्रयत्न केला का? असे एकामागोमाग एक प्रश्न ॲड. साळशिंगीकर यांनी विचारले; पण त्यांनी ‘नाही’ असे सांगितले.

Web Title: ...so the name 'that' was not included in the charge sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.