...म्हणून भटक्या श्वानांना बसवणार मायक्रो चिप; महापालिकेच्या अभिनव योजनेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:26 IST2025-11-09T18:24:54+5:302025-11-09T18:26:34+5:30
भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवल्यावर या प्रणालीमुळे प्रत्येक कुत्र्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होणार

...म्हणून भटक्या श्वानांना बसवणार मायक्रो चिप; महापालिकेच्या अभिनव योजनेला सुरुवात
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व महापालिकांना भटक्या श्वानांच्या संख्येवर प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर, पुणे महापालिकेने श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसह मायक्रोचिप बसविण्याची अभिनव योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत, शुक्रवारी (दि. ७) कात्रज येथील नसबंदी शस्त्रक्रिया केंद्रात तीन भटक्या श्वानांच्या प्रथमच मायक्रोचिप बसविण्यात आल्या.
या संदर्भात, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत भटक्या कुत्र्यांना नसबंदी शस्त्रक्रिया करताना त्यांच्यात मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मायक्रोचिपच्या माध्यमातून प्रत्येक कुत्र्याची ओळख, रंग, ठिकाण, नसबंदी शस्त्रक्रियेची तारीख, लसीकरणाचा दिनांक, तसेच संबंधित संस्था आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे भटक्या श्वानांचे संगोपन, पुनर्लसीकरण आणि रेबीज नियंत्रणाच्या कामात अधिक पारदर्शकता आणि अचूकता येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या निर्णयास मान्यता दिली असून, महापालिकेसोबत कार्यरत असलेल्या सर्व संस्थांना नसबंदी शस्त्रक्रिये दरम्यान मायक्रोचिप बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एका प्राणीप्रेमी महिलेच्या सहकार्याने मोहम्मदवाडी व हडपसर परिसरातील तीन भटक्या श्वानांच्या त्वचेमध्ये प्रथमच मायक्रोचिप बसविण्यात आल्या आहेत. या मायक्रोचिप प्रणालीमुळे प्रत्येक कुत्र्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे, लसीकरणाचा मागोवा घेणे आणि त्याच त्या श्वानांवर पुन्हा नसबंदी होण्याचा धोका टाळणे सोपे होणार आहे. या उपक्रमामुळे ‘रेबीजमुक्त पुणे’ या मोहिमेला मोठा हातभार लागणार आहे.
स्वयंसेवी संस्थेमार्फत भटक्या श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसोबत मायक्रोचिप बसविण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागांतील सुमारे ६०० भटक्या श्वानांमध्ये मायक्रोचिप बसविण्यात येणार आहे. त्यानंतर स्कॅनिंगद्वारे त्यांचे निरीक्षण व परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच शहरातील सर्व भटक्या श्वानांमध्ये मायक्रोचिप बसविण्यासाठी खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - डॉ. सारिका भोसले-फुंडे, पशुवैद्यक अधिकारी, पुणे महापालिका.