...म्हणून मोदी हतबल; ‘एपस्टीन फाइल’च्या गोपनीय कागदपत्रात ३ आजी-माजी खासदारांची नावे - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:30 IST2025-12-16T17:29:13+5:302025-12-16T17:30:25+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच पक्षाकडून दबाव वाढायला लागल्याने त्यांनी ही गोपनीय कागदपत्रे उघड करण्याचा निर्णय घेतला

...म्हणून मोदी हतबल; ‘एपस्टीन फाइल’च्या गोपनीय कागदपत्रात ३ आजी-माजी खासदारांची नावे - पृथ्वीराज चव्हाण
पुणे : 'अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एपस्टीन याच्यावर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, हनी ट्रॅप यांसारखे गंभीर गुन्हे असून, या संदर्भातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय अमेरिकेच्या सिनेटने घेतला आहे. या प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स, ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांच्यासह भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश असल्याचा दावा करीत, १९ डिसेंबरला ही कागदपत्रे उघड झाल्यानंतर देशात मोठी राजकीय उलथापालथ होईल,' असा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. या गोपनीय कागदपत्रांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हतबल असण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. मराठी माणूस हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असा दावा करण्यामागे हे माझे राजकीय विश्लेषण असल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी 'अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एपस्टीन या प्रकरणाचा इतिवृत्तांत कथन केला. 'जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण यासंबंधी त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्याला अटक करून कारागृहात डांबण्यात आले. मात्र या प्रकरणाची गोपनीय कागदपत्रे दडवून ठेवण्यात आली. मात्र ही माहिती कळताच सोशल मीडियावर यांच्याशी संबंधित नावे उघड करण्याच्या मागणीने जोर धरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच पक्षाकडून दबाव वाढायला लागल्याने त्यांनी ही गोपनीय कागदपत्रे उघड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. १९ डिसेंबरला ही कागदपत्रे उघड केली जाणार आहेत. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केलेली युद्धबंदी मान्य करत मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबविले, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्रात जे चालले आहे. त्याला सर्वस्वी केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज दबला आहे. विरोधी पक्ष प्रभावीपणे जनतेचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवित नसेल, तर लोकशाहीच्या हत्येत त्याचाही सहभाग असतो. विधानसभेत विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याचा गैरफायदा घेत विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही. या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच काही प्रमाणात युवकांना, जनतेला जोडण्यात काँग्रेस कमी पडत आहे. लोकसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास आणि जागावाटपाच्या घोळाचा फटका काँग्रेसला बसला असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
प्रस्तावित अणू ऊर्जा निर्मितीमधील खासगीकरणाला विरोध करणार
केंद्र सरकारने अणु ऊर्जा निर्मितीमध्ये खासगी कंपन्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून, दोन ते तीन दिवसात यासंबंधीचे विधेयक मांडले जाणार आहे. आम्ही जितका माल पुरवू तितकेच आपले उत्तरदायित्व असेल अशाप्रकारचे खासगीकरण धोक्याचे आहे. त्यामुळे अणू ऊर्जा निर्मितीमधील खासगीकरणाला काँग्रेस विरोध करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.