...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:16 IST2025-10-05T08:15:40+5:302025-10-05T08:16:17+5:30
पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.

...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ तयार केले, पण मंत्र्यांकडे अधिकारच नव्हते. उद्धव ठाकरे मंत्रालयात फक्त दोनदा गेले. त्यामुळे कामे रखडली. आदित्य ठाकरे यांना मंत्री बनवणे ही त्यांची सर्वांत मोठी चूक होती. आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरून पक्ष बळकट केला असता तर वेगळा परिणाम झाला असता. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यालयात कधीही आमदारांच्या बैठका घेतल्या नाहीत. याचा फायदा अजित पवारांनी उचलल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.
मुंबई-गोवा महामार्ग पुढील सव्वा वर्षात पूर्ण होईल...
खरे सांगायचे तर, सुरुवातीला भूसंपादनाच्या अडचणींमुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले होते. काही तांत्रिक निर्णयही चुकीचे घेतले गेले. उदा., रस्ता काँक्रीटऐवजी डांबरी ठेवला गेला, जो कोकणाच्या हवामानात टिकू शकत नव्हता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी काँक्रीटचा निर्णय घेतला गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घातल्याने कामाला गती मिळाली. भारतातील सर्वाधिक रखडलेल्या प्रकल्पांपैकी हा एक आहे. सध्या ८०% काम पूर्ण झाले. खरेतर काही अंशी हे आमचं अपयश आहे. मात्र कोकणात आंदोलने, मोर्चे फारसे होत नाहीत, त्यामुळे जनतेनेही संयम बाळगला. आता सव्वा वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल, याची खात्री आहे.
ठरावीक अधिकाऱ्यांच्या मदतीने वाळू माफिया कार्यरत असतात, हे मान्य करत ते म्हणाले, रॉयल्टी न भरता वाळू उपसली जाते. या समस्येवर उपाय म्हणून एम-सॅण्ड धोरण आणले जात आहे. नदी-खाडीतून वाळू न काढता, मेटलपासून बनवलेली एम-सॅण्ड वापरणे हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक तालुक्यात एम-सॅण्डचे प्लांट उभारण्याचे नियोजन आहे.
दुकाने, हॉटेल्स चोवीस तास खुली राहिल्यास रोजगार...
राज्य सरकारने दुकाने आणि हॉटेल्स चोवीस तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे कायदा सुवस्था आणि कामगार दोन्हींचा प्रश्न भेडसावेल. परंतु चांगली गोष्ट होईल की रोजगार वाढेल. दोन शिफ्टमध्ये कामगारांना काम देता येईल. कदम पुढे म्हणाले, अमली पदार्थ तस्करीविरोधात आम्ही कठोर निर्णय घेतले आहेत. आरोपींवर मकोका लावला जात आहे. शाळा-कॉलेज परिसरातील टपऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. शाळा कॉलेजमध्ये पालकांसमवेत प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. त्याकरिता नवीन बीएनएस कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कठोर पावले
वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला असला तरी गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सध्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याकडे दोन डझन प्रकरणांचा भार असतो. तो भार कमी करण्यासाठी आता किरकोळ केसेस हाताळण्याचे अधिकार हवालदारांना देण्यात आले आहेत.
तपास वेळेत झाला नाही की दोषारोपपत्र दाखल होण्यास विलंब लागण्याबरोबरच न्यायालयात सातत्याने तारखा पडण्याचे प्रकार घडतात. मात्र, यापुढे न्यायालयात दोनच वेळा तारखा घेण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षेचे प्रमाण नक्कीच वाढेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.