सुबाभुळ, कडुलिंब, आंबा, शिरस, बाभूळच्या लाकडाची तस्करी; जुन्नरमध्ये वनविभागाकडून मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 20:24 IST2025-12-12T19:43:49+5:302025-12-12T20:24:27+5:30
संबंधित लाकूड वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे चालकाकडे आढळली नसल्याने वाहनासह लाकूड जप्त करण्यात आले

सुबाभुळ, कडुलिंब, आंबा, शिरस, बाभूळच्या लाकडाची तस्करी; जुन्नरमध्ये वनविभागाकडून मोठी कारवाई
ओतूर (जुन्नर) : ओतूर परिसरात अवैध लाकूड वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाकडून सतत गस्त वाढवण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी डुंबरवाडी जवळील टोल नाक्यावर मोठी कारवाई करण्यात आली. अवैध लाकूड वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वनपथकाला मिळताच तत्काळ पथक रवाना करण्यात आले. टोल नाक्यावर संशयितरित्या जात असलेला एम.एच १६ ए.वाय ७५५४ हा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली.
तपासात ट्रकमध्ये सुबाभुळ, कडुलिंब, आंबा, शिरस व बाभूळ अशा विविध प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर अवैध सरपण लाकूड आढळून आले. संबंधित लाकूड वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे चालकाकडे आढळली नसल्याने वाहनासह लाकूड जप्त करण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालक सोमनाथ गणेश श्रीरसागर (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) व वाहनमालक गोपाल दिनेश कारलीया (रा. ओतूर) यांच्यावर भारतीय वनसंरक्षण अधिनियम १९२७ कलम ४१(२बी), ४२ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील नियम ३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी उपवनरक्षक, जुन्नर प्रशांत खाडे व सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी ओतूर चैतन्य कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबवली. वनपाल एस.एम. बुट्टे, वनरक्षक व्हि.ए. बेले व के.एफ. खराडे यांनी या छापेमारीत सक्रिय सहभाग नोंदवला. वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात वनसंपत्ती रक्षणासाठी विभाग अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.