पुणे :पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे; पण ही कारवाई केवळ छोट्या व्यावसायिकांवर होत असून, मोठ्या व्यावसायिकांवर, चौपाट्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष कशासाठी केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अतिक्रमण कारवाई केल्यानंतर पुन्हा अवघ्या काही तासांत रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होत आहे. त्यामुळे पुणे शहरात अतिक्रमण कारवाईचा निव्वळ फार्स सुरू असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही महिन्यांत शहरातील अतिक्रमण कारवाई थंडावल्याने सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पादचारी मार्ग, रस्त्यांवर पथारी, स्टॉल, टपऱ्यांची संख्या वाढली. त्याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेने अतिक्रमण कारवाई करून रस्ते, पादचारी मार्ग, इमारतींचे फ्रंट व साइड मार्जिन मोकळे केले. शहराच्या विविध भागात रात्री सातनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत; पण महापालिका रात्रीच्या वेळी अत्यंत किरकोळ कारवाई करत आहे.
अतिक्रमण कारवाईनंतर परस्थिती ‘जैसे थे’
महापालिकेच्या अतिक्रमण बांधकाम विभागाच्या मदतीने नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील खराडी झेन्सॉर आयटी पार्क परिसर, खराडी मुंढवा बायपास रस्ता, विमाननगर आदी भागात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली होती. साइड मार्जिन, रस्ते मोकळे केले होते. महापालिकेने ही कारवाई केल्यानंतर तेथून पथक निघून गेले. त्यानंतर, ज्या लोकांनी अतिक्रमण काढून घेतले, त्यांनी पुन्हा रस्ता, पादचारी मार्ग व्यापून पुन्हा त्यांचे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे कारवाई नंतर अतिक्रमणाची परस्थिती ‘जैसे थे’ होत आहे.
कारवाईला येण्यापूर्वीच पथारी व्यावसायिकांना मिळते ‘टीप’शहरातील पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे करून थाटलेल्या व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते; पण कारवाई करण्यासाठी अतिक्रमण पथक निघताच कारवाईची माहिती स्टॉलधारक, हातगाडी, पथारी व्यावसायिकांना मिळते. दुकानदार त्यांचे दुकानाबाहेरील साहित्य आतमध्ये घेतात. त्यामुळे अवघ्या ५-१० मिनिटांत रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिक गायब होतात. अतिक्रमण पथकाची गाडी निघून गेल्यानंतर परत रस्ता अतिक्रमणांनी गजबजून जातो. अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारीच ही ‘टीप’ देत असल्याने महापालिकेची कारवाई केवळ दिखाऊ ठरत आहे.
बदल्या करूनही धडाकेबाज कारवाई नाही
अनधिकृत व्यावसायिकांशी असलेल्या लागेबांध्यामुळे कारवाईकडे कानाडोळा केला जातो. अतिक्रमणांवर कठोर कारवाई होण्यासाठी आणि अतिक्रमण निरीक्षकांचे लागेबांधे तोडण्यासाठी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण निरीक्षकांच्या तीन महिन्यांनी बदल्या केल्या जात आहे; पण तरीही अतिक्रमण निरीक्षकाकडून धडाकेबाज कारवाई होत नाही.
ठोस कारवाई कधी?
शहरातील पथारी व्यावसायिकांना महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्नपदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक पथारीधारक गॅस सिलिंडर वापरत आहेत. त्यामुळे पालिकेने या व्यावसायिकांकडून गॅस सिलिंडर जप्त केले जातात; पण गॅस सिलिंडर वापरणाऱ्या पथारीधारकांवर ठोस कारवाई केली जात नाही. अतिक्रमण विभागात मनुष्यबळ कमीपुणे महापालिकेत ३२ गावे समाविष्ट झाली आहेत. या गावांमध्येही मोठया प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळी कमी पडत आहे.
महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पुन्हा ते रस्त्यावर येत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी पालिका सतत कारवाई करणार आहे. पालिका मोठ्या व्यावसायिक आणि अनधिकृत चौपाट्यांवरही कारवाई करत आहे. - संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग