TET-3 exam : ‘टेट-३ परीक्षेला सहा महिने उलटले, भरती प्रक्रियेचा पत्ता नाही; डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:22 IST2025-11-05T12:21:54+5:302025-11-05T12:22:06+5:30
‘टेट-३ परीक्षेला सहा महिने उलटले, भरती प्रक्रियेचा पत्ता नाही; डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांची नाराजी; शासनावर टाळाटाळ केल्याचा आरोप

TET-3 exam : ‘टेट-३ परीक्षेला सहा महिने उलटले, भरती प्रक्रियेचा पत्ता नाही; डी.एड., बी.एड.धारक उमेदवारांची नाराजी
पुणे : राज्यातील लाखो डी.एड. आणि बी.एड. पदवीधर उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट-३) परीक्षेला आता जवळपास सहा महिने उलटले आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, या निकालानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेच्या मते, शिक्षक भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि शासनाची उदासीन भूमिका यामुळे पात्र उमेदवार निराश झाले आहेत. अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या टप्प्यावर पोहोचले असून, त्यांच्या करिअरवर गदा येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या अभावामुळे दयनीय स्थितीत असून, हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार कंत्राटी शिक्षकांच्या जागी कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याचे संघटनांनी नमूद केले आहे. कंत्राटी व अपात्र शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षणाची जबाबदारी सोपविल्याने राज्याचा शैक्षणिक दर्जा सातत्याने खालावत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. राज्य सरकारकडून तातडीने ठोस पावले न उचलल्यास, सुशिक्षित बेरोजगार तरुण राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास बाध्य होतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे. या संंदर्भात माहिती घेण्यासाठी सहउपसंचालक राजेश शिंदे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन सहा महिने होत आहेत, तरीही पवित्र पोर्टलवर नोंदणी किंवा शिक्षकांच्या जाहिरातीचा पत्ता नाही. आश्रम शाळा, समाजकल्याण शाळेवर पवित्र पोर्टलवर भरती केली जावी ते एक बिंदू एक पदभरती करून प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. अन्यथा शिक्षकांच्या मागण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार आहे. - संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र
पवित्र पोर्टलवर होणारी दिरंगाई विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करत आहे. शासनाने तातडीने शिक्षक भरती करावी आणि सर्व अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा. -अब्दुल शेख, सामान्य अभियोग्यता धारक
कंत्राटी शिक्षक धोरण रद्द करून, टीईटी पात्र व अभियोग्यताधारक उमेदवारांची कायम नियुक्ती करण्यात यावी. तसेच समूह शाळा धोरणही रद्द करावे. - अजय पवार