Pune: शहरातून एकाचवेळी ४२ सराईत गुन्हेगार तडीपार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
By नम्रता फडणीस | Updated: April 23, 2024 14:53 IST2024-04-23T14:49:34+5:302024-04-23T14:53:07+5:30
गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करत शहरात धुमाकूळ होता

Pune: शहरातून एकाचवेळी ४२ सराईत गुन्हेगार तडीपार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
पुणे : गेल्या काही दिवसात शहर परिसरात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत चालले आहे. यात र्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ पाचमध्ये कडे पाहिले जात असल्याने या परिमंडळातील सात पोलीस ठाण्यामधील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये ४ टोळी प्रमुखांचा समावेश असून,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.
शहरातील पोलीस ठाण्याची पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. परिमंडळ पाचमधील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांचा उपद्रव मोठा आहे. शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगचा विषय राज्यभर गाजला. या कारवाईची सुरुवात ही हडपसरमधून झाली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतील गुन्हेगारीवृत्तीला आळा घालणे व प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार परिमंडळ पाचमधील हडपसर विभाग व वानवडी विभागांचे अधिपत्याखाली येणाऱ्या वेगवेगळयां पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यांस करण्यात आला. त्यावरून परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.