Muncipal Election: महापालिकेसाठी महायुती अन् महाविकास आघाडी दोन्हीतही स्वतंत्र लढण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:59 IST2025-09-25T18:58:35+5:302025-09-25T18:59:39+5:30
विसर्जित महापालिकेत स्वबळावर सलग ५ वर्षे सत्ता राबवलेल्या भाजपचे पदाधिकारीही अजित पवारांना बरोबर घेण्याच्या विरोधात असल्याचे उघड आहे

Muncipal Election: महापालिकेसाठी महायुती अन् महाविकास आघाडी दोन्हीतही स्वतंत्र लढण्याची चिन्हे
पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिकेसाठी राज्यस्तरावर आघाडी नाही, असे पुण्यातून जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रम स्वतंत्रपणे उपनगरांमध्ये घेणे सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकताही ‘आपले आपण लढु’ अशीच आहे. यावरून महापालिकेच्या लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीत युती व आघाडी या दोन्हीचीही शक्यता धुसर झाली आहे.
असे आहे चित्र
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सपकाळ यांनी स्पष्टपणे राज्यस्तरावर महाविकास आघाडी होणार नाही, असे सांगितले. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, निवडणूक लढवू इच्छिणारे यांच्या अन्य पक्षांबरोबर अडचणी असतात. लोकसभा, विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी चांगले काम केले. आता त्यांची निवडणूक असताना त्यांना आघाडीच्या बंधनात बांधणे योग्य नाही, त्यामुळेच राजकीय शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्तरावरच आघाडीसंबधीचा निर्णय घ्यावा, असे सपकाळ यांनी जाहीर केले. विसर्जित महापालिकेत स्वबळावर सलग ५ वर्षे सत्ता राबवलेल्या भाजपचे स्थानिक पदाधिकारीही अजित पवार यांना बरोबर घेण्याच्या विरोधात असल्याचे उघड आहे. त्यानंतरच पुण्यातील राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आघाडीची स्थिती
काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. त्यांच्यासमवेत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. शिवसेनेबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बोलणी सुरू आहे. या युतीला शरद पवार यांची हरकत नसली तरी काँग्रेसची आहे. त्यामुळेच सपकाळ यांनी आधीच हे वक्तव्य केले असल्याची चर्चा आहे. काँग्रेसची विसर्जीत सभागृहात नगरसेवकांची संख्या कमी (९) असली तरीही पुण्यात त्यांची एक स्वतंत्र मतपेढी आहे. आघाडीमधून ती बाहेर गेली तर आघाडीसमोर आव्हान उभे राहील असे दिसते आहे. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगरांमध्ये राजकीय वर्चस्व होते, मात्र त्यात आता फुट पडली आहे. मनसेला सुरूवातीच्या राजकीय यशानंतर पुण्यात कायमच अपयश पहावे लागले. तरीही आघाडीमध्ये काँग्रेससह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र लढायचे आहे. त्यामुळेच निवडणूक तोंडावर आली तरीही एखादा दुसरा अपवाद वगळता आघाडीची साधी प्राथमिक बैठकही अद्याप झालेली नाही. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षालाही मनसेची प्रतिक्षा असल्याने त्यांची भूमिका अजून गुलदस्त्यातच आहे.
युतीची स्थिती
युतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचा समावेश आहे. यातील भाजप हा विसर्जीत महापालिकेतील सत्ताधारी पक्ष आहे. संघटनात्मक स्तरावरही पक्षाची बांधणी मजबूत आहे. दिल्लीत राज्यात सत्ता, केंद्रीय मंत्रीपद यामुळे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिका घेतलीच ताब्यात या मनस्थितीत आहेत. राष्ट्रवादीचे वर्चस्व त्यांना नकोच आहे.
भाजपच्या आधी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होती व त्यावर अजित पवार यांचेच वर्चस्व होते. फुटीनंतरही अजित पवार यांना पुणे शहरातील त्यांचे राजकीय वजन कायम असल्याचे दाखवून द्यायचे आहे. महापालिका निवडणूक ही त्यासाठीची संधी आहे. भाजपबरोबर युती करून निवडणूक लढवली तर त्यांच्या शिलेदारांवर मर्यादा येईल. हक्काच्या जागांची मागणी झाली तर त्या भाजपला सोडाव्या लागतील. वर्चस्व असलेल्या उपनगरातील जागा शिंदेसेनेला द्याव्या लागतील, त्यामुळे अजित पवारही स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येते. शिंदे सेना अजूनतरी युती व्हावी किंवा न व्हावी याबाबतीत तटस्थ असल्याचे दिसते आहे.