श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक;पृथ्वीराज जाचक यांच्यासह दहा उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 09:38 IST2025-04-08T09:37:11+5:302025-04-08T09:38:20+5:30
पाच वर्षांनी निवडणुकीला मुहूर्त मिळाल्याने संचालकपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक;पृथ्वीराज जाचक यांच्यासह दहा उमेदवारी अर्ज दाखल
बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्यासह दहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी कारखान्याची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिलाच दिवस होता. यामध्ये पहिल्याच दिवशी दहा जणांनी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. पाच वर्षांनी निवडणुकीला मुहूर्त मिळाल्याने संचालकपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समन्वयक म्हणून किरण गुजर यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
याबाबत किरण गुजर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, एकूण उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री जनमाणसांत चांगली प्रतिमा असणाऱ्या व्यक्तींना संचालकपदासाठी संधी देण्याबाबत पवारांनी सूचना दिल्या.
उमेदवारी अर्ज दाखल केलेली नावे पुढीलप्रमाणे...
पृथ्वीराज साहेबराव जाचक, विक्रम विजयसिंह निंबाळकर, अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर, शिवाजी रामराव निंबाळकर, दिलीप शिवाजी भोईटे, श्रीनिवास रामचंद्र कदम, भाऊसाहेब तुकाराम सपकळ, सुनील गणपत काळे, किरण बबनराव गुजर व अंजली श्रीनिवास कदम.
कारखाना हित केंद्रबिंदू
अर्ज दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक एकत्रित बसून अंतिम यादी तयार करण्याबाबत निर्णय घेतील. कारखाना हित यामध्ये केंद्रबिंदू असेल, असे गुजर म्हणाले. १५ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.