शस्त्र परवान्यासाठी बनाव? युवासेना जिल्हाध्यक्ष घारे यांच्या गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश
By किरण शिंदे | Updated: May 26, 2025 16:52 IST2025-05-26T16:51:16+5:302025-05-26T16:52:30+5:30
पोलीस संरक्षण मिळावे आणि आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हा डाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे

शस्त्र परवान्यासाठी बनाव? युवासेना जिल्हाध्यक्ष घारे यांच्या गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश
पुणे: 19 मे रोजी रात्री वारजे माळवाडी परिसरात घडलेली गोळीबाराची घटना आता नाट्यमय वळणावर आली आहे. सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेनेच्या युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, वारजे पोलिसांच्या तपासात हा गोळीबार स्वतः घारे यांनीच आखलेला कट होता, ज्यामागे मुख्य उद्देश होता शस्त्र परवाना मिळवणे आणि पोलिस संरक्षण मिळवणे.
घटनास्थळाचा तपशील
19 मे रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास घारे आपल्या सहकाऱ्यांसोबत माळवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात पोहोचले होते. कार्यालयाबाहेर त्यांच्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर घारे यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
घटनेनंतर वारजे पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सक्रिय झाले. तपासात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशीत कबूल केले की, निलेश घारे यांच्या सांगण्यावरूनच हा बनाव रचण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ या तिघांना अटक केली. तर अन्य एक आरोपी संकेत मातले, सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनाव?
मिळालेल्या माहितीनुसार, घारे यांनी काही महिन्यांपूर्वी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिस संरक्षण मिळावे आणि आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हा डाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे. सद्यस्थितीत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात असून घारे यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही यावर तीव्र चर्चा सुरू आहे. पुढील तपासात घारे यांच्यावर गुन्हा दाखल होतो का आणि पोलिस त्यांना अटक करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.