Should there be rules for pedestrians too? | पादचाऱ्यांसाठी सुद्धा असावेत का नियम ? नागरिक म्हणतात...

फाेटाे : तन्मय ठाेंबरे

पुणे : पादचाऱ्यांना रस्त्यावरचा राजा म्हंटलं जातं. पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालताना प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु असं असलं तरी अनेकदा पादचाऱ्यांच्या स्वैरस्वभावामुळे अनेक अपघात देखील घडत असतात. वाहनांसाठी सिग्नल सुटलेला असताना काही पादचारी रस्ता ओलांडत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. यामुळे वाहतूक मंदावतेच त्याचबराेबर एखादा अपघात हाेण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पादचाऱ्यांना देखील वाहनचालकांसारखे नियम असावेत का ? तसेच ते माेडल्यास दंड देखील व्हावा का ? याबाबत नागरिकांशी लाेकमतने संवाद साधला.

काही दिवसांपूर्वी बाणेर भागात रस्ता दुभाजकावरुन रस्ता ओलांडताना एका कारची धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाला. अशीच घटना पुण्यातील गांजवे चाैकात घडली हाेती. रस्ताच्या मधूनच रस्ता ओलांडताना अचानक सिग्नल सुटल्याने बस चालकाला रस्ता ओलांडणारी व्यक्ती न दिसल्याने बसखाली येऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हाेता. शहरातील अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी आवश्यक त्या साेयीसुविधांचा अभाव आहे. परंतु ज्या ठिकाणी या साेयी आहेत तिथे देखील पादचाऱ्यांकडून हलगर्जीपणाने रस्ता ओलांडला जाताे. 

याविषयी बाेलताना माधव बाेकारे म्हणाले, बऱ्याचवेळा पादचारी हे वाहनांसाठी सिग्नल सुटलेला असताना रस्ता ओलांडत असतात. तसेच रस्त्याच्या मधून वाट्टेल तेथून रस्ता ओलांडला जाताे. त्यामुळे जर पादचाऱ्यांसाठी नियम असेल्यास त्याची शिस्त पादचाऱ्यांना लागेल आणि वाहतूक सुरळीत हाेण्यासाठी देखील मदत हाेईल. याेगेश देसाई म्हणाले, पादचाऱ्यांसाठी नियम असायला हवेत. बऱ्याचदा वाहनांच्या अडून लाेक रस्ता ओलांडत असतात. अशावेळी अपघात हाेण्याची शक्यता असते. अशावेळी वाहनचालक सर्व नियम पाळत असून देखील त्याची पादचाऱ्याला धडक बसल्यास वाहनचालकालाच दाेषी ठरवले जाते. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी नियम असल्यास सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते याेग्य हाेईल. त्याचबराेबर ते नियम माेडल्यास दंडही करायला हवा, कारण दंड असल्याशिवाय नागरिक नियम पाळणार नाहीत. 

शेखर शिंदे म्हणाले, बाहेरील देशांमध्ये प्रत्येकजण आपआपली जबाबदारी ओळखून नियम पाळत असतात. परंतु आपल्याकडे तसे हाेत नाही. ज्या पद्धतीने वाहचालकांना काही नियम आहेत, तसेच नियम पादचाऱ्यांना हवेत तसेच ते माेडल्यास त्यांना दंडही करण्यात यायला हवा. जागृती राऊत म्हणाल्या, वाहनचालवताना अचानक काेणी समाेर आले तर अनेकदा अपघात हाेत असतात. अशावेळी सर्वस्वी दाेष हा वाहनचालकाला दिला जाताे. जाे चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडताे त्याला दाेष दिला जात नाही. हे चुकीचे आहे. पादचाऱ्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखायला हवी. त्यामुळे पादचाऱ्यांना देखील नियम असायला हवेत तसेच ते माेडल्यास त्यांच्याकडून दंडही वसूल करायला हवा. 

...तर पादचाऱ्यांकडून शिस्तपालनाची अपेक्षा करणे फलदायी ठरणार नाही.
चालण्यासाठी व रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सुविधा जशा आवश्यक आहेत तशा शहरभर उपलब्ध नाहीत. वाहतूक पोलिसांचे लक्ष व कृती फक्त वाहनांच्या सुरळित वाहतुकीवर केंद्रीत असते व त्यांच्याकडून वाहतूक नियोजनात व नियमनात रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. वाहनचालक बेशिस्त व नियमभंग करत वाहतूक करतात त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण हाेत असताे. पादचारी धोरणात मनपा व वाहतूक पोलिसांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत, ज्या त्यांच्याकडून पाळल्या जात नाहीत.वर्षानुवर्षे ही विदारक स्थिती असल्यामुळे पादचारी देखील आपापल्या सोयीनुसार रस्त्यावर वावरताना दिसतात. सद्यस्थितीत व्यवस्थेत उपयुक्त व शाश्वत बदल न करता पादचाऱ्यांकडून शिस्तपालनाची अपेक्षा करणे फलदायी ठरणार नाही. परंतु असे सर्व असून देखील हेही आवश्यक आहे की पादचाऱ्यांनीसद्धा परिस्थिती गंभीर आहे हे जाणून रस्त्यावर सदैव सतर्क राहावे, चालताना व रस्ता ओलांडताना स्वयंशिस्त पाळावी आणि स्वत:च्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घ्यावी. यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल.   
- प्रशांत इनामदार, निमंत्रक, पादचारी प्रथम 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Should there be rules for pedestrians too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.