धनकवडी : कात्रज घाटात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि३०) रात्री उघडकीस आली असून या मध्ये एक जण जखमी झाला आहे. दिपक राजू लूकड (वय ४२, रा. औंध पुणे,) असे गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कर्जास कंटाळून दारुच्या नशेत स्वतः वर गोळी झाडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
भारती विद्यापीठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारी रात्री कात्रज मार्शल हद्दीत पेट्रोलिंग करताना घाटामध्ये एक तरुण जखमी असल्याचे कळाले, जखमी व्यक्तीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्या छातीत गोळी लागली असून आता प्रकृती स्थिर आहे, तरुणाने सांगितले की दोन्ही इसमानी कात्रज घाटात घेऊन जाऊन माझ्या कडून जबरदस्तीने पैसे घेऊन राऊंड फायर केला आहे.
दरम्यान पोलिसांनी सदर घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपास करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता असे निष्पन्न झाले की, त्यांनी सदरची घटना स्वतःहून केली आहे. त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन अधिक तपास करता त्यांनी असे सांगितले की त्याच्यावर लोन असल्यामुळे कर्जास कंटाळून त्याने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली अन् घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांच्या तपासात एक पिस्तुल देखील सापडलं आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.