एकीकडे लसींचा तुटवडा, तर दुसरीकडे साठेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:47+5:302021-07-02T04:09:47+5:30

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात एकीकडे लसीसाठी हजारो नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागत आहे. लस न ...

Shortage of vaccines on the one hand, hoarding on the other | एकीकडे लसींचा तुटवडा, तर दुसरीकडे साठेबाजी

एकीकडे लसींचा तुटवडा, तर दुसरीकडे साठेबाजी

Next

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात एकीकडे लसीसाठी हजारो नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागत आहे. लस न मिळाल्याने अनेक नागरिक लस न घेताच माघारी फिरत असल्याचे चित्र आहे. यासोबतच लस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईन्मेंटसाठीही झगडावे लागत असल्याची परिस्थिती आहे. शासनाकडून लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याचे सांगितले जात असल्याची स्थिती असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांकडे ५ लाख ४० हजार लसींचे डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

याबाबत राज्य शासनाने जिल्ह्याला कळवले आहे. यामुळे हे शिल्लक डोस नागरिकांना लवकरात लवकर देऊन लसीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी या दवाखान्यांना केले आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून जिल्ह्याला लसींचा कमी प्रमाणात पुरवठा झाला. यामुळे लसीकरण संथगतीने सुरू आहे. सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा पुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. मात्र, लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत कमी होत असल्याने लसीकरणाचा वेग जिल्ह्यात संथगतीनेच सुरू आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत लस मिळत नसल्याने अजूनही अनेक नागरिक लस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लस मिळण्याची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. मात्र, राज्याने जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लस शिल्लक असल्याचे कळवले आहे. जवळपास ५ लाख ४० लाख डोस शिल्लक असल्याने जिल्ह्यात लसींची साठेबाजी होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात पुणे शहरात ३०५, पिंपरी-चिंचवडमध्ये ११३, तर ग्रामीण भागात १६७ लसीकरण केंद्रे आहेत. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना दर महिन्याला लस पुरविली जाते.

------------

राज्यात २३ लाख ८९ हजार डोस शिल्लक

जिल्ह्याप्रमाणे राज्यातही अनेक खासगी दवाखान्यांकडे लस शिल्लक आहे. ही संख्या जवळपास २३ लाख ८९ एवढी आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लवकरात लवकर या लसी नागरिकांना देणे गरजेचे आहे.

Web Title: Shortage of vaccines on the one hand, hoarding on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.