A shortage of money, so the newspaper vendor was robbed; The two accused were arrested by the police | पैशांची होती चणचण, मग काय वृत्तपत्र विक्रेत्यालाच लुटले; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

पैशांची होती चणचण, मग काय वृत्तपत्र विक्रेत्यालाच लुटले; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

ठळक मुद्देपैशाची चणचण असल्याने केली साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी

पुणे : स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरील पुलाखाली वृत्तपत्र विक्री करणाऱ्या विक्रेत्याला तलवारीचा धाक दाखवून ९० हजार रुपये लुटणाऱ्या  दोघा सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.

गौरव ऊर्फ लाल्या सुहास फडणीस (वय ३०, रा. पर्वती दर्शन) आणि अक्षय ऊर्फ पप्पु कैलास गरुड (वय २२, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शंकर खुटवड हे गुरुवारी सकाळी उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्री करीत होते. त्यांनी बँकेत भरण्यासाठी शबनम पिशवीत ९० हजार ३०० रुपये ठेवले होते. खुटवड हे सचिन सोंडकर याला ओळखतात. खुटवड यांच्याकडे रोज जास्त पैसे असल्याची माहिती सोंडकर याला होती. त्यातूनच त्याने खुटवड यांना बोलण्यात गुंतवून लुबाडण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून शबनम पिशवी जबरदस्तीने चोरुन नेली. त्यावेळी तेथे वृत्तपत्र घेण्यासाठी आलेल्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्यावरही चाकू, तलवार उगारुन धमकाविले होते.


पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार शुक्रवारी ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे व अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांनी या गुन्ह्यातील २ आरोपी जनता वसाहतीतील लोखंडी पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांना कळवून उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी केली होती. पैशाची चणचण असल्याने साथीदारांच्या मदतीने ही जबरी चोरी केली होती. त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

या आरोपींवर पुणे शहरातील दत्तवाडी, बिबवेवाडी, स्वारगेट, वारजे -माळवाडी तसेच ग्रामीण भागातील सासवड, सांगली, घोडेगाव, पौड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय खोमणे अधिक तपास करीत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A shortage of money, so the newspaper vendor was robbed; The two accused were arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.