दुकानावर लाथा मारल्या; फलक, टीव्ही फोडला, दिवाळीत कोंढव्यात टोळक्याची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:08 IST2025-10-24T19:07:54+5:302025-10-24T19:08:07+5:30
आरोपींनी दहशत माजवल्यामुळे नागरिक घाबरले, दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली

दुकानावर लाथा मारल्या; फलक, टीव्ही फोडला, दिवाळीत कोंढव्यात टोळक्याची दहशत
पुणे : कोंढव्यात टोळक्याने दहशत माजवून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली. तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजवणाऱ्या तिघांना कोंढवापोलिसांनीअटक केली. हामजा खान (२०), फिदा खान (२०) आणि शाहरूख शेख (१८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर मोहम्मद युसुफ शेख (४७, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख यांचे मिठानगर भागात दुकान आहे. आरोपी खान, शेख आणि साथीदार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिठानगर परिसरात आले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजवली. परिसरातील दुकानांच्या दरवाजावर लाथा मारल्या, तसेच एका चिकन विक्री दुकानाचा एलईडी फलक फोडला. एका भंगार माल दुकानाच्या बाहेर ठेवलेला टीव्ही फोडला. आरोपींनी दहशत माजवल्यामुळे नागरिक घाबरले. दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली. पसार झालेल्या आराेपींना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक खराडे पुढील तपास करत आहेत.
बोपोडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न...
बोपोडी भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाला अटक केली. दीपक जगदीश कोरी (२०, भाऊ पाटील चाळ, बोपोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रोहित अमर उबाळे (२५, रा. नटराज चौक, बोपोडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत उबाळे याने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उबाळे याची बहीण आणि आरोपीच्या नात्यातील एक तरुणी मैत्रिणी आहेत. आरोपीच्या नात्यातील तरुणीशी एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती उबाळे याच्या बहिणीला होती. प्रेमसंबंधांची कुणकुण लागल्याने आरोपी कोरी चिडला होता. २० ऑक्टोबर रोजी तो आणि दोन साथीदार उबाळेच्या घरी गेले. आरोपींनी उबाळेच्या बहिणीला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी उबाळेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेला आरोपी कोरी याला अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले पुढील तपास करत आहेत.