वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 22:30 IST2025-07-23T21:42:25+5:302025-07-23T22:30:03+5:30

न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Shooting at New Ambika Kala Kendra in Wakhari; Case registered against four including MLA's brother | वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल

वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे/यवत : वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. यात सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची चर्चाही सुरू झाली. पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. समाजमाध्यमांवर माहिती प्रसारित होऊ लागल्याने ३६ तासांनंतर स्वत: पोलिसांनी पत्रकार परिषदेत गोळीबाराचा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, गणपत जगताप, बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश आहे.

अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी वाखारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात आरोपींनी आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. ही घटना प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली होती; त्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले होते. यावेळी पोलिसांनी या घटनेप्रकरणी तपास सुरू केला होता; मात्र पोलिसांना ठोस माहिती मिळत नव्हती. यावेळी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांना पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर ही घटना निदर्शनात आली. या गोळीबाराच्या घटनेत मात्र कोणीही जखमी झाले नाही. सर्व आरोपी हे मुळशी तालुक्यातील असल्याची पोलिसांनी प्रथमदर्शनी माहिती दिली. आरोपींना अद्याप अटक केली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. यावेळी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे उपस्थित होते.

 
पार्टी लावण्यावरून वादाचा संशय

अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रुईकरांची पार्टी होती. मात्र, त्याचवेळी संशयित आरोपी यांनीही त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आग्रह धरला. त्यातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी या सर्व प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र पोलिसांनी कोणीही तक्रार द्यायला आले नाही म्हणून काहीही केले नाही. परंतु, ज्यावेळी आमदाराच्या भावाचाही समावेश असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर येऊ लागले, तेव्हा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘तिन्ही कलाकेंद्र चालकांचे जबाब नोंदवत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासले; पण त्यामध्ये असे काही आढळून आले नाही.’ आम्ही दुसऱ्यांदा सीसीटीव्ही चेक करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

दुसऱ्यांदा गोळीबार 

चौफुला येथील अंबिका कला केंद्र हे नावाजलेले आहे. एकेकाळी बरखा, अप्सरा या नामवंत नृत्यांगनांचा कलाविष्कार
राज्यात गाजला आहे. त्यांचे बंधू अशोक जाधव यांच्या मालकीचे हे कला केंद्र आहे. यापूर्वीही या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबारामुळे हे कला केंद्र चर्चेत आले आहे.

पोलिसांचे खबरी नेटवर्क झाले कमी

जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगार खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबारासारखे प्रकार करत आहेत. मात्र, एवढे सगळे होऊनही पोलिसांना माहिती मिळत नाही हे विशेष! कलाकेंद्रात गोळीबार झाला हे पोलिसांना माहीत नाही. विशेष म्हणजे तपासासाठी ते तक्रारीची वाट पाहत बसले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला त्यांचे खबरे ठरावीकच माहिती कळवितातर; मात्र, कलाकेंद्रातील गोळीबाराची माहिती कोणालाही कळली नाही, याचाच अर्थ पोलिसांचे खबरी नेटवर्क कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. 
 

आमदाराने घेतली पोलिस अधीक्षकांची भेट

मंगळवारी (दि. २२) पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या भेटीला एक आमदार गेले होते. ते नेमक्या कोणत्या कारणासाठी आले होते हे समजू शकले नसले तरी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Web Title: Shooting at New Ambika Kala Kendra in Wakhari; Case registered against four including MLA's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.