ओझर: अपघातात मयत झालेल्या जवानाच्या पत्नीला विवाहाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करीत तिच्या नावे असलेले ३१ लाख १७ हजार रुपये उकळणाऱ्या इसमावर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश लहानू काकड (रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्यासह लहानू काकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २९ वर्षीय महिलेने आळेफाटा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भारतीय सैन्यात असलेल्या जवानाचे ड्यूटीवर हजर होत असताना २६ ऑक्टोबर २०१५ रोजी अपघातात निधन झाले. पतीच्या आर्मी इन्शुरन्सचे ३२ लाख रुपये तिला मिळाले होते. ऑक्टोबर २०१७ पासून आळेफाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून महिला कार्यरत होती. १७ डिसेंबर २०१७ ते दि. ८ एप्रिल २०२५ या कालवधीत गणेश लहानू काकड याने तिच्याशी ओळख व जवळीकता साधून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे वचन देऊन आळेफाटा तळेगाव, ओझर येथे लॉजवर नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध करून अश्लील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले, तसेच वारंवार फोन करून लॉजवर बोलवून तिला मानसिक त्रास दिला, तसेच पतीचे इन्शुरन्सचे मिळालेले ३१ लाख १७ हजार ४१६ रुपये बँक अकाउंटवरून काढून घेतले. बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा सदर महिलेने गणेश लहानू काकड व लहानू काकड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धुर्वे करीत आहेत.